तृणमूलचा ‘इंडिया’ला दे धक्का! प. बंगालमधील सर्वच्या सर्व ४२ जागांसाठी उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 05:42 AM2024-03-11T05:42:57+5:302024-03-11T05:43:10+5:30

काँग्रेससह मित्रपक्षांसाठी एकही जागा सोडली नाही.

lok sabha election 2024 shock to india alliance trinamool congress announced candidates for all 42 seats in west bengal | तृणमूलचा ‘इंडिया’ला दे धक्का! प. बंगालमधील सर्वच्या सर्व ४२ जागांसाठी उमेदवार जाहीर

तृणमूलचा ‘इंडिया’ला दे धक्का! प. बंगालमधील सर्वच्या सर्व ४२ जागांसाठी उमेदवार जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीला धक्का देत राज्यातील सर्व ४२ लोकसभा मतदार संघासाठी रविवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापताना पक्षाने यावेळी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण व कीर्ती आझाद यासारख्या अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली. विशेष म्हणजे पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी मित्रपक्ष काँग्रेससाठी एकही जागा सोडली नाही.

तृणमूलने १६ विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. या यादीत १२ महिलांच्या नावांचा समावेश आहे. क्रिकेटपटू युसूफ पठाण बहरामपूर, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोलमधून, कीर्ती आझाद यांना वर्धमान-दुर्गापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. बसीरहाट लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार नुसरत जहाँ यांच्या जागी माजी खासदार हाजी नुरुल इस्लाम यांना संधी देण्यात आली आहे. 

याशिवाय लोकसभेतून हकालपट्टी झालेल्या महुआ मोईत्रा यांना सलग दुसऱ्यांदा कृष्णानगर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. अभिनेत्री सायोनी घोष, देबांगशु भट्टाचार्य, गोपाल लामा, अभिनेत्री रचना बॅनर्जी हे काही नवे चेहरे आहेत. कोलकाता येथे आयोजित तृणमूलच्या मेळाव्यात ही यादी जाहीर करण्यात आली. 

काँग्रेसला अद्यापही युतीची आशा 

- पश्चिम बंगालमधील सर्व जागांसाठी तृणमूल काँग्रेसने एकतर्फी उमेदवारांची घोषणा केली असताना काँग्रेसला अद्यापही युतीची आशा आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आपले दरवाजे युतीसाठी खुले असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
- काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, काँग्रेसने बंगालमध्ये तृणमूलसोबत जागावाटपावर सन्मानजनक करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  काँग्रेसला दोनपेक्षा जास्त जागा देऊ शकत नाहीत, असे तृणमूलने म्हटले आहे.

युसूफ पठाण विरुद्ध अधीर रंजन चौधरी?

क्रिकेटपटू युसूफ पठाण लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात आहे. 

आम्ही बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार. काँग्रेस, भाजप, माकपा यांचा मुकाबला करणार. आम्ही आसाम आणि मेघालयातही लढणार. उत्तर प्रदेशात एका  जागेसाठी समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्याशी चर्चा सुरू आहे. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल.
 

Web Title: lok sabha election 2024 shock to india alliance trinamool congress announced candidates for all 42 seats in west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.