मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 09:02 AM2024-06-01T09:02:09+5:302024-06-01T09:03:22+5:30
या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणाैत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत काैर बादल आदी विराेधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा शनिवारी (दि. १ जून) पार पडणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणाैत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत काैर बादल आदी विराेधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत. यावेळीची निवडणूक प्रामुख्याने भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडी यांच्यात झाली.
उत्तर प्रदेशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडीतील सदस्य समाजवादी पार्टी, काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. तृणमूल काँग्रेसचा गड असलेल्या दक्षिण बंगालमध्ये ‘जुने विरुद्ध नवीन’ सत्तासंघर्ष दिसून येणार आहे. पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल १९९६ नंतर प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, तर इंडिया आघाडीतील दोन पक्ष काँग्रेस आणि आप यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
- नरेंद्र माेदी - भाजप - वाराणसी - उत्तर प्रदेश
- रविशंकर प्रसाद - पक्ष : भाजप - पाटणा साहिब - राज्य : बिहार
- अनुराग ठाकूर - भाजप - हमीरपूर - हिमाचल प्रदेश
- अभिषेक बॅनर्जी - तृणमूल काँग्रेस - डायमंड हार्बर - प. बंगाल
- रवि किशन - भाजप - गाेरखपूर - उत्तर प्रदेश
- कंगना रणौत - भाजप - मंडी - हिमाचल प्रदेश
सायंकाळी साडेसहानंतर येणार ‘एक्झिट पोल’
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वेबसाईट १ जून रोजी संध्याकाळी ६:३० नंतर ‘एक्झिट पोल’ची आकडेवारी प्रसिद्ध करू शकतील.
- काेणी किती जागा लढविल्या?
भाजप ४४१
काँग्रेस ३१८
सपा ६२
तृणमूल काँग्रेस ४७
आरजेडी २४
डीएमके २१
उद्धवसेना २१
२५ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू
वाराणसी/पाटणा : उत्तर भारतातील तीव्र उष्णतेच्या लाटेदरम्यान युपी आणि बिहारमध्ये २५ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे १३, साेनभद्र येथे २ तर बिहारमधील भाेजपूर येथे ५, राेहतास येथे ३ आणि कैमूर व औरंगाबादमध्ये प्रत्येक एक कर्मचारी दगावला. या सर्वांना तीव्र ताप, उच्च रक्तदाब आणि वाढलेली रक्त शर्करा अशी लक्षणे हाेती. बिहारमध्ये गेल्या दाेन दिवसांत २४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.