‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 05:56 PM2024-05-20T17:56:08+5:302024-05-20T17:57:31+5:30
Lok Sabha Election 2024: तुरुंगातून बाहेर आल्यापासून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर घणाघाती आरोप करत आहेत. हे आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच दिल्लीमधील तीन मेट्रो स्टेशन आणि एका मेट्रो ट्रेनमध्ये अरविंद केजरीवाल यांना मारण्याची धमकी देणारे संदेश लिहिल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच दिल्लीतील कथित मद्यघोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. त्यामुळे आप आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा आमने सामने आले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्याने अरविंद केजरीवाल हे तुरुंगाबाहेर आले आहेत. दिल्लीत २५ मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी केजरीवाल यांची सुटका झाल्याने आम आदमी पक्षाला बळ मिळाले आहे. तसेच तुरुंगातून बाहेर आल्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती आरोप करत आहेत. हे आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच दिल्लीमधील तीन मेट्रो स्टेशन आणि एका मेट्रो ट्रेनमध्ये अरविंद केजरीवाल यांना मारण्याची धमकी देणारे संदेश लिहिल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हे संदेश असलेला फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांबाबत अपमानास्पद उल्लेख करण्यात आलेला आहे. आता हे संदेश म्हणजे भाजपाकडून अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा कट असल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
आता हे संदेश लिहिलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षाने दिल्ली निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. आपचे नेते संजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा कथित कट हा पंतप्रधान कार्यालयामधून रचली गेली होती, असा दावा केला आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासून भाजपा घाबरली आहे. भाजपा आता अरविंद केजरीवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचत आहे. हा कट थेट पंतप्रधान कार्यालयामधूम संचालित होत आहे, असा सनसनाटी दावाही आपने केला आहे.
संजय सिंह म्हणाले की, राजीव चौक आणि पटेलनगर मेट्रो स्टेशनवर केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश लिहिण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनीही भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये होणाऱ्या पराभवामुळे सैरभैर झाला आहे. अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यासाठी स्वाती मालिवाल यांचा वापर केला. आता अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका आहे, असा आरोप त्यांनी केला.
एका व्यक्तीने राजीव चौक, पटेल चौक आणि पटेल नगर या तीन मेट्रो स्टेशनवरील भिंतींवर धमकी देणारे संदेश लिहिले आहेत. त्यानंतर हे फोटो सोशल सोशल मीडियावर व्हायरल केले. या स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच सुरक्षारक्षक २४ तास तैनात असतात. मग त्या व्यक्तीवर कारवाई का केली गेली नाही. सायबर सेल कुठे आहे? यावरून हा भाजपाचा डाव असल्याचे सिद्ध होतंय, असा आरोप आतिशी यांनी केला.