जगातील सर्वांत खर्चीक ठरणार यंदाची लोकसभा निवडणूक; अमेरिकेलाही टाकणार मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 05:42 AM2024-04-26T05:42:03+5:302024-04-26T05:42:48+5:30
२० टक्के खर्च आयाेग करणार, निवडणुकीच्या खर्चात राजकीय पक्ष, संस्था, उमेदवार, सरकार तसेच निवडणूक आयाेगातर्फे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे.
काेलकाता : काेणतीही निवडणूक म्हटली की खर्च येताेच. यावेळची लाेकसभा निवडणूक जगातील सर्वांत खर्चीक निवडणूक ठरणार आहे. यंदा सुमारे १.३५ लाख काेटी रुपये खर्च हाेण्याचा अंदाज एका संस्थेने वर्तविला आहे.
निवडणुकींमध्ये हाेणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवून असलेल्या ‘सेंटर फाॅर मीडिया स्टडीज’ या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. निवडणुकीच्या खर्चात राजकीय पक्ष, संस्था, उमेदवार, सरकार तसेच निवडणूक आयाेगातर्फे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे. संस्थेने म्हटले की, यावर्षी डिजिटल प्रचार जास्त हाेत आहे. राजकीय पक्ष कॉर्पाेरेटप्रमाणे काम करीत असून व्यावसायिक संस्थांच्या सेवा घेत आहेत.
सरकारचा खर्च किती?
संस्थेने यापूर्वी सुमारे १.२० लाख काेटी रुपये यंदाच्या निवडणुकीत खर्च हाेतील, असा अंदाज व्यक्त केला हाेता. ताे आता वाढविला आहे. यापैकी २० टक्के खर्च निवडणूक आयाेग करणार आहे. इतर खर्च हा राजकीय पक्ष व उमेदवारांकडून हाेण्याचा अंदाज आहे.
१,४०० रुपये प्रति मतदार खर्चाचा अंदाज.
१.२ लाख काेटी रुपये २०२०मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत खर्च
६,५०० काेटी रुपये निवडणूक आयाेगाने गेल्या लाेकसभा निवडणुकीत खर्च केल्याचा अंदाज आहे.
१,५०० काेटी रुपये गेल्या लाेकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्रसिद्धीवर खर्च केले हाेते.
१,२२३ काेटी रुपयांपेक्षा जास्त खर्च प्रमुख सात राष्ट्रीय पक्षांनी केला हाेता.