लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रातील या ५ मतदारसंघांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 07:35 AM2024-04-19T07:35:16+5:302024-04-19T08:43:27+5:30
Lok Sabha Election 2024: जगातील सर्वात मोठी लोकशाही असा लौकिक असलेल्या भारतामधील लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज देशभरातील २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असा लौकिक असलेल्या भारतामधील लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज देशभरातील २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आज महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
Voting for the first phase of #LokSabhaElections2024 begins. Polling being held in 102 constituencies across 21 states and Union Territories. pic.twitter.com/nmOroXexsx
— ANI (@ANI) April 19, 2024
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जिथे राज्यातील सर्व जागांवर मतदान होत आहे. त्यामध्ये तामिळनाडू (३९ जागा), उत्तराखंड (५ जागा), अरुणाचल प्रदेश (२ जागा), मेघालय (२ जागा), अंदमान आणि निकोबार (१ जागा), मिझोराम (१ जागा), नागालँड (१ जागा), पुदुचेरी (१ जागा), सिक्किम (१ जागा), आणि लक्षद्वीप (१ जागा) यांचा समावेश आहे. तर राजस्थान (१२ जागा), उत्तर प्रदेश (८ जागा), मध्य प्रदेश (६ जागा), आसाम (५ जागा), महाराष्ट्र (५ जागा), बिहार (४ जागा). पश्चिम बंगाल (३ जागा), मणिपूर (२ जागा), त्रिपुरा, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एखा जागेवर आज मतदान होत आहे.
त्याबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीचं मतदानही आज होत आहे. अरुणाचल प्रदेशमधील विधानसभेच्या ६० आणि सिक्कीममधील विधानसभेच्या ३२ जागांसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार या नेत्यांचं भवितव्य मतदार निश्चित करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आणि विशेषकरून तरुण मतदारांना अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून मतदानाला सुरुवात होत आहे. २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील १०२ जागांवर मतदान होत आहे. येथील मतदारांना मी अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करत आहे. तसेच तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी अधिकाधिक संख्येनं मतदान करावं. प्रत्येक मत महत्त्वपूर्ण असतं, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या आवाहनामध्ये म्हटले आहे.
PM Narendra Modi says, "The 2024 Lok Sabha elections commence today! As 102 seats across 21 States and UTs go to the polls, I urge all those voting in these seats to exercise their franchise in record numbers..."#LokSabhaElections2024pic.twitter.com/7rJrJRTvgt
— ANI (@ANI) April 19, 2024