जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 05:25 AM2024-05-13T05:25:21+5:302024-05-13T05:31:12+5:30

राज्यातील ११ जागांसह २९८ उमेदवारांचे भाग्य होणार ईव्हीएमबंद; आंध्र प्रदेश, ओडिशा विधानसभेसाठी लढत

lok sabha election 2024 voting today for fourth stage including maharashtra and warning of raining | जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान

जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या तीन टप्प्यात झालेल्या मतदानावेळी उष्णतेच्या लाटेचा मतदारांना सामना करावा लागला होता. परंतु, सोमवारी (दि. १३) होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी राज्यासह देशातील विविध भागांत गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाचा अंदाज घेत मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह १० राज्यांतील ९६ जागा व आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५, तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागासांठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्यातील २९८ उमेदवारांचे भाग्य सीलबंद होणार आहे.

चौथ्या टप्प्यात होणाऱ्या ९६ जागांपैकी ६६ जागा आंध्र प्रदेश (२५), तेलंगणा (१७), उत्तर प्रदेश (१३) व महाराष्ट्र (११) या चार राज्यांतील आहेत. त्यामुळे या टप्प्यातील प्रचारावेळीही प्रमुख पक्षांकडून या चार राज्यांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. चौथा टप्पा संपताच देशातील लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३८० म्हणजेच ७० टक्के मतदारसंघातील रणधुमाळी संपणार आहे. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये केवळ १६३ मतदारसंघ शिल्लक राहतील.

आंध्र, ओडिशातही रणधुमाळी  

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासह आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ व ओडिशातील पहिल्या टप्प्यातील २८ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. सत्ता मिळविण्यासाठी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी रणशिंग फुंकले आहे. दुसरीकडे ओडिशात चार टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बीजेडीचे नवीन पटनायक यांची सत्ता आहे. परंतु, यंदा भाजपनेही चांगलाच जोर लावला आहे. 

लोकसभेचा चौथा टप्पा

लोकसभेच्या एकूण जागा ९६, निवडणूक होत असलेली राज्ये/ केंद्रशासित प्रदेश १०, महाराष्ट्रात ११ जागा

मतदारसंघ उमेदवार
नंदुरबार     ११
जळगाव     १४
रावेर     २४
जालना     २६
औरंगाबाद ३७
मावळ     ३३
पुणे     ३५
शिरुर     ३२
अहमदनगर २५
शिर्डी     २०
बीड     ४१

पारा घसरला, आता टक्का उसळू द्या!

मुंबई : वादळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात घसरण झाल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. चौथ्या टप्प्यातील ११ पैकी ९ मतदारसंघांत सोमवारी कमाल तापमान ४० अंशांच्या आत राहणार आहे.

किती आहे तापमान?

नंदुरबार : ४०, जळगाव : ४०, रावेर : ३८, जालना : ३७, पुणे : ३४, शिरूर : ३५, मावळ : ३४, अहमदनगर : ३६, शिर्डी : ३६, बीड : ३५, औरंगाबाद : ३४, (स्त्रोत : ॲक्यूवेदर)

 

Web Title: lok sabha election 2024 voting today for fourth stage including maharashtra and warning of raining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.