भाजपनं संदेशखलीतील ‘पीडिते’ला दिली लोकसभेची उमेदवारी, त्यांच्या विरोधातच लागले पोस्टर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:51 PM2024-03-26T12:51:33+5:302024-03-26T12:52:23+5:30
पात्रा यांच्या विरोधातील पोस्टरसंदर्भात भाजपने राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला दोषी ठरवले आहे. मात्र, टीएमसीने हा आरोप फेटाळला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी संदेशखली प्रकरण बरेच गाजले होते. संपूर्ण देशभरात याची चर्चा झाली. यानंतर आता भाजपने संदेशखली प्रकरणातील ‘‘पीडिता’’ रेखा पात्रा यांना बशीरहाट लोकसभा जागेसाठी उमेदवारी दिली आहे. मात्र यानंतर, या मतदारसंघातील काही ठिकाणी त्यांच्या विरोधातच पोस्टर लागल्याचे दिसून आले. या हस्तलिखित पोस्टरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रेखा पात्रा यांच्या उमेदवारीचा निषेध करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेखा पात्रा यांचा छळ केल्याचा आरोप आहे.
पात्रा यांच्या विरोधातील पोस्टरसंदर्भात भाजपने राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला दोषी ठरवले आहे. मात्र, टीएमसीने हा आरोप फेटाळला आहे. पात्रा यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले आहे. मात्र त्या अद्याप आधिकृतपणे भाजपमध्ये सहभागी झालेल्या नाहीत. संदेशखली हा बशीरहाट मतदारसंघाचा एक भाग आहे.
या जागेसाठी भाजपने पात्रा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवारी हे पोस्टर आढळून आले. या पोस्टर्सवर "आम्हाला रेखा उमेदवार म्हणून नको आहेत" आणि "आम्हाला रेखा पात्रा या भाजपच्या उमेदवार म्हणून नको आहेत," असे लिहिले होते. यासंदर्भात बोलताना एका स्थानिक भाजप नेत्याने म्हटले आहे की, “ते पोस्टर्स आमचे नव्हते. हीन दर्जाचे राजकारण करण्यासाठी तृणमूल काँग्रेसने असे केले आहे.
मात्र टीएमसीने हा आरोप फेटाळला आहे. या भागातील काही महिलांनी पात्रा यांना उमेदवार म्हमून घोषित केल्याचा आनंद साजरा केला आहे. ‘‘यापूर्वी आम्ही कधीही खासदाराला बघितले नव्हते. आता आमच्या गावातूनच एक खासदार होऊ शकतो,’’ असे एक स्थानिक महिलेने म्हटले आहे.