या ठिकाणी पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांचीच प्रतिष्ठा लागली पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 07:26 AM2024-05-07T07:26:29+5:302024-05-07T07:26:43+5:30
पंजाबमध्ये अनेक ठिकाणी तिहेरी लढती; वाडिंग, बादल, जाखड यांची प्रयत्नांची पराकाष्ठा
- बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : पंजाबच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्या पक्षाच्या पक्षाध्यक्षांचा आलेख उंचावणार आणि कोणाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचणार, हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. सध्या सर्वच पक्षांच्या अध्यक्षांना आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. पंजाबमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जूनरोजी होणार आहे.
बादल यांचा मार्ग खडतर?
भाजपसोबतचा करार न झाल्याने अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांना भटिंडा भागातून पत्नी हरसिमरत कौर बादल यांना निवडून आणणे, हे मोठे आव्हान आहे.
विद्यमान खासदारांसमाेर आव्हान
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या पारंपरिक संगरूर मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंग मीत हैर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार सुखपाल सिंह खैरा यांना तिकीट दिले आहे. गेल्या पोटनिवडणुकीत या जागेवर ‘आप’ला पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेससोबत कोणताही करार न झाल्याने पंजाबमधील सर्व १३ जागा जिंकण्याची जबाबदारी मान यांच्यावर आली आहे.
अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांची लुधियानात भाजपचे रवनीत सिंह बिट्टू यांच्याशी लढत आहेत. बिट्टू यांनी गेल्या तीन निवडणुका जिंकल्या आहेत आणि ते अद्याप अपराजित आहेत.