Lok Sabha Election : बिहारमध्ये सासऱ्यासमोर जावयाच्या आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 02:50 PM2019-03-29T14:50:40+5:302019-03-29T14:51:24+5:30
राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव बंडखोरी करण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर ते सासरे चंद्रिका राय यांच्याविरुद्ध सारण मतदार संघातून लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये सासरा आणि जावई यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे.
पाटना - बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपांचा पेच अखेर सुटला आहे. दरभंगा मतदार संघ राष्ट्रीय जनता दल मिळाला असून सुपोल मतदार संघ काँग्रेसला मिळाला आहे. त्यात आता राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव बंडखोरी करण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर ते सासरे चंद्रिका राय यांच्याविरुद्ध सारण मतदार संघातून लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये सासरा आणि जावई यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून तेजप्रताप यादव कुटुंबियांवर नाराज असून वेगळे राहत आहेत. तेज प्रताप सारणमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. परंतु, सारणमधून चंद्रिका राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सारणमधून अपक्ष लढविण्याचा निर्णय तेजप्रताप यांनी घेतला आहे. परंतु, या संदर्भात अधिकृत घोषणा त्यांच्या वतीने करण्यात आलेली नाही. चंद्रिका राय हे तेजप्रताप यादव यांचे सासरे आहेत. सारण मतदार संघ राजदसाठी खास आहे. या मतदार संघातून यापूर्वी लालू यादव आणि राबडी देवी यांनी निवडणूक लढवली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून तेज प्रताप कुटुंबियांवर नाराज आहेत. तसेच तेज प्रताप आणि तेजस्वी यांच्यात देखील मतभेद असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर तेजप्रताप जहानाबाद आणि शिवहर मतदार संघात आपल्या पसंतीचे उमेदवार देण्यास इच्छूक होते. ऐनवेळी त्यांची पत्रकार परिषद रद्द झाली होती. परंतु, तेजप्रताप केवळ त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांचे नाव सुचवणार होते, असं तेजस्वी यादव यांनी म्हटले होते.
दरम्यान महायुतीकडून बिहारमधील उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आले आहेत. आता नाराज तेज प्रताप यादव यांच्या भूमिकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच मुलाच्या बंडखोरीवर लालू यादव काय तोडगा काढणार पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.