'मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही घेऊ शकत नाही', अमित शाह यांचे मोठे वक्तव्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 05:52 PM2024-04-09T17:52:08+5:302024-04-09T17:52:50+5:30
विरोधकांकडून सातत्याने चीनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला जातो.
Lok Sabha Election : गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरू आहे. या सीमावादामुळे अनेकदा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशातच, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून चीन मोठ्या प्रमाणावर भारतीय भूमीवर कब्जा करतोय, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. पण, प्रत्येकवेळी सरकारकडून या आरोपाचे खंडन केले जाते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याचा पुन्नरुच्चार केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी(दि.9) आसाममधील लखीमपूर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून, चीन भारताची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ शकला नाही. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये चिनी हल्ल्यावेळी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला 'बाय-बाय' केले होते, हे जनता कधीही विसरू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.
अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तुमचा खासदार कोण असेल, कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला हवंय आणि पुढचा पंतप्रधान कोणाला करायचे, हे तुम्हाला 19 एप्रिलला ठरवावे लागेल. तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत, एका बाजूला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI आघाडी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आहे.
यावेळी शाह यांनी राम मंदिराचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बांगलादेशची सीमा सुरक्षित करुन घुसखोरी थांबवली. आगामी काळात आसाम देशातील इतर राज्यांप्रमाणे विकसित राज्य बनेल. काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवला, पण हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आला.