पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:43 AM2024-05-02T04:43:31+5:302024-05-02T04:56:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मे रोजीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपच्या सर्व ९३ उमेदवारांना पत्र लिहून काही निवडणुकीतील मुद्द्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे.
संजय शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना वेगवेगळी पत्रे लिहून तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठीचे धोरण स्पष्ट केले आहे. या पत्रामध्ये लिहिलेले मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचवावे आणि काँग्रेस पक्षाला विभाजनवादी असल्याचे उघडपणे सांगावे, असे उमेदवारांना सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मे रोजीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपच्या सर्व ९३ उमेदवारांना पत्र लिहून काही निवडणुकीतील मुद्द्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया, ज्योतिरादित्य सिंधिया, प्रल्हाद जोशी, एसपी सिंह बघेल, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह ९३ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.
पत्रातील मुद्दे काय?
काँग्रेसच्या विभाजनवादी धोरणांबाबत मतदारांना माहिती द्यावी.
काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसी वर्गाचे आरक्षण काढून घेऊन धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ इच्छिते.
धर्माच्या नावावरील आरक्षण अनैतिक असले तरी व्होट बँकेसाठी काँग्रेस असे गैरप्रयत्न करीत आहे.
वारसा कर लागू करणे ही काँग्रेसची धोकादायक कल्पना असल्याचे सांगून पंतप्रधानांनी देशातील जनतेला याची जाणीव करून द्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यापर्यंत विविध मुद्द्यांवर भाजप उमेदवारांच्या नावे पंतप्रधान मोदी यांची पत्रे तयार आहेत.
निवडणुकीचा जो टप्पा पूर्ण होईल, त्यानंतर लगेच पुढील टप्प्यातील उमेदवारांची पत्रे पाठवली जातील. प्रत्येक निवडणुकीतील मुद्दे वेगवेगळे असतील.