पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 06:00 AM2024-06-02T06:00:59+5:302024-06-02T06:26:06+5:30
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 :बहुतांश एक्झिट पोलने म्हटले आहे की, भाजप हा पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठा पक्ष असेल.
नवी दिल्ली : २०१९ मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपने चकित करणारी कामगिरी केली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. यंदा भाजप त्यापेक्षाही चांगली कामगिरी करेल असा अंदाज आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल.
बहुतांश एक्झिट पोलने म्हटले आहे की, भाजप हा पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठा पक्ष असेल. गेल्या वेळी तृणमूलने २२ जागा जिंकल्या होत्या. एनडीटीव्हीच्या पोल ऑफ पोल्स आणि एकंदरीतच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, यंदा पश्चिम बंगालमध्ये भाजपला २२ जागा मिळू शकतात. तर, तृणमूल काँग्रेसला १९ जागा मिळू शकतात. जन की बातच्या सर्वेक्षणात भाजपला २१ ते २६ जागा आणि तृणमूल काँग्रेसला १६ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्सचा आकडा भाजपसाठी २१ आणि तृणमूलसाठी १९ आहे. रिपब्लिक भारतने भाजपला २१ ते २५ जागा दिल्या आहेत. तर, तृणमूलला १६ ते २० जागा मिळतील असा अंदाज आहे. तीन इतर एक्झिट पोलमध्ये भाजपला २० पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे.