किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 09:37 AM2024-06-02T09:37:22+5:302024-06-02T09:37:42+5:30
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : गेल्या काही निवडणुकांबाबतचे एक्झिट पाेल किती खरे ठरले, काेणाचे अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास हाेते? याबाबत घेतलेला आढावा.
नवी दिल्ली : देशातील लाेकसभा निवडणुकीचे मतदान अखेर संपले. मतदान संपल्यानंतर काही वेळातच ‘एक्झिट पाेल’चे आकडे समाेर आले. या आकड्यांवर आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘एक्झिट पाेल’ किती खरे ठरतात? हा प्रश्न प्रत्येक निवडणुकीनंतर विचारला जाताे. गेल्या काही निवडणुकांबाबतचे एक्झिट पाेल किती खरे ठरले, काेणाचे अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास हाेते? याबाबत घेतलेला आढावा.
२०१९
ही निवडणूक म्हणजे माेदी सरकारची पहिली परीक्षा हाेती. यावेळी ‘एक्झिट पाेल’ने ‘एनडीए’चे सरकार पुन्हा स्थापन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त करताना एनडीएला सरासरी ३०६, तर यूपीएला सरासरी १२० जागा दिल्या हाेत्या. मात्र, प्रत्यक्ष निकालात बराच फरक पडला.
संस्था एनडीए यूपीए
न्यूज२४-चाणक्य ३५० ९५
सीव्हाेटर २८७ १२८
इंडिया टुडे-ॲक्सिस ३५२ ९३
एबीपी-सीएसडीएस २७७ १३०
इंडिया टीव्ही-सीएनएक्स ३०० १२०
सरासरी ३०६ १२०
प्रत्यक्ष निकाल ३५३ ९३
२०१४
यावेळी जवळपास सर्वच ‘एक्झिट पाेल’मधून ‘एनडीए’ची सत्ता स्थापन हाेणार असल्याचा अंदाज वर्तविला हाेता. त्यावेळी एनडीएला सरासरी २८३ जागा, तर यूपीएला १०५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला हाेता. मात्र, माेदी लाटेमध्ये यापेक्षा जास्त यश एनडीएला मिळाले.
संस्था एनडीए यूपीए
न्यूज२४-चाणक्य ३४० ७०
इंडिया टीव्ही-सीव्हाेटर २८९ १०१
सीएनएन-सीएसडीएस २८० ९७
एबीपी-नेल्सन २७४ ९७
ओआरजी २४९ १४८
सरासरी २८३ १०५
प्रत्यक्ष निकाल ३३६ ६०
२००९
ही निवडणूक काँग्रेसच्या नेतृत्वातील सत्ताधारी यूपीए सरकारची पहिली परीक्षा हाेती. त्यावेळी एक्झिट पाेलने यूपीएला १९५ आणि एनडीएला १८५ जागा दिल्या हाेत्या. चुरशीची लढत हाेणार असल्याचा हा अंदाज हाेता. झालेही तसेच प्रत्यक्षात यूपीएला बहुमत मिळाले नव्हते. इतर पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर यूपीएचे सरकार स्थापन झाले.
संस्था एनडीए यूपीए
स्टार-नील्सन १९६ १९९
सीएनएन १७५ १९५
सी-व्हाेटर १८९ १९५
हेडलाइन्स टुडे १८० १९१
सरासरी १८५ १९५
प्रत्यक्ष निकाल १५९ २६२