उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 08:17 PM2024-06-01T20:17:02+5:302024-06-01T20:17:52+5:30
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून काय निकाल लागेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पुन्हा एकदा मोठं यश मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सर्वाधिक प्रभाव टाकणारं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखताना मोठा विजय मिळवला होता. मात्र यावेळी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून काय निकाल लागेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पुन्हा एकदा मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊ नवभारत ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ६६ ते ७० जागा मिळण्याची शक्यता आहे.
टाईम्स नाऊ नवभारत ईटीजीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपा आणि मित्रपक्षांना उत्तर प्रदेशमध्ये ६६ ते ७० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीला १० ते १३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच इतरांना ० ते १ जागा मिळू शकता. पक्षनिहाय विचार केल्यास भाजपाला ६१ ते ६४ जागा मिळू शकतात. तर सपाला ९ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १ ते २, आरएलडीला १- ते २ आणि सुभासपाला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यात एक जागा जाईल.
तर उत्तर प्रदेशबाबत पीएमएआरक्यूच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला एनडीएला ६९ ते ७४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीला ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.