परभणीतील बालाजी मंदिराचे महंत बिहारमध्ये निवडणूक रिंगणात; अपक्ष म्हणून लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 07:02 AM2024-05-02T07:02:54+5:302024-05-02T07:03:27+5:30
महंत अखिलेश्वर श्रीवैष्णव (२९) यांनी आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून ते मूळचे पूर्व चंपारण जिल्ह्यातील चिरैया ब्लॉकमधील पारेवा गावचे आहेत.
एस.पी. सिन्हा
पाटणा : महाराष्ट्रातील परभणी येथील बालाजी मंदिराचे महंत अखिलेश्वर श्रीवैष्णव यांनी बिहारमधील शिवहर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. श्रीवैष्णव यांना भाजपकडून तिकीट हवे होते, पण ते न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
महंत अखिलेश्वर श्रीवैष्णव (२९) यांनी आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून ते मूळचे पूर्व चंपारण जिल्ह्यातील चिरैया ब्लॉकमधील पारेवा गावचे आहेत. ते अजूनही अविवाहित असून ते निरुपणकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४ लाख ९१ हजार ८६० रुपये आहे. परभणीच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात महंत अखिलेश्वर श्रीवैष्णव यांच्याविरुद्ध विश्वासघात, फसवणूक, शिवीगाळ आणि धमकीचे तीन गुन्हे प्रलंबित आहेत. त्यांच्याकडे अडीच लाख रुपये रोख आहेत. त्यांची चार बँक खाती आहेत. महाराष्ट्रातील परभणी सहकारी बँक शाखेत २१ हजार रुपये असल्याचे समोर आले आहे.
महंतांकडे फॉर्च्युनर कार
महंतांकडे फॉर्च्युनर आहे, जिची किंमत ३५ लाख रुपये आहे. त्यांची जंगम मालमत्ता ६८ लाख ५१ हजार रुपये आहे. महंतांची परभणीत १५ एकर जमीन असून, तिची किंमत ३ कोटी ८० लाख रुपये आहे.
रूपहरा येथे १६,८३० चौरस फूट अकृषिक जमीन असून, तिची किंमत १५ लाख ४३ हजार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १,८०० चौरस फूट जमीन आहे.
जिची किंमत ६१ लाख २० हजार रुपये आहे. त्यांची स्थावर मालमत्ता ४ कोटी ४९ लाख रुपये आहे. त्यांच्यावर ९.८९ लाख रुपयांचे सुवर्णकर्ज आहे. याशिवाय २० लाख ८९ हजार रुपयांचे इतर कर्ज आहे.
कर्ज किती?
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८०० चौरस फूट जमीन आहे. ज्याची किंमत ६१ लाख २० हजार रुपये आहे.
त्यांची एकूण स्थावर मालमत्ता ४ कोटी ४९ लाख ५० हजार रुपये आहे. त्यांच्यावर परभणीच्या बँक ऑफ इंडिया शाखेचे ९.८९ लाख रुपयांचे सुवर्णकर्ज आहे.
याशिवाय वास्तू फिनसर्व्ह ऑफ इंडियाचे ११ लाख रुपयांसह एकूण २० लाख ८९ हजार रुपयांचे कर्ज आहे.
त्यांच्याकडे ४१० ग्रॅम सोने असून त्याची किंमत २८ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे दीड लाख रुपये किमतीचे दोन महागडे मोबाइल आहेत.