Lok Sabha Election Result 2024 : १९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का; स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवार पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 07:47 AM2024-06-05T07:47:59+5:302024-06-05T07:53:56+5:30
Lok Sabha Election Result 2024 : पराभूत मंत्र्यांमध्ये तीन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.
Lok Sabha Election Result 2024 : नवी दिल्ली : स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, अर्जुन मुंडा, आर. के. सिंह यांच्यासह माेदी सरकारमधील १९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पराभूत मंत्र्यांमध्ये तीन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.
स्मृती इराणी यांचा अमेठीमध्ये पराभव झाला. अर्जुन मुंडा यांचा खुंटी मतदारसंघात काॅंग्रेसच्या कालीचरण मुंडा यांनी १.४९ लाख मतांनी पराभव केला. बिहारच्या आरा मतदारसंघातून आर. के. सिंह यांचा ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. तर चंदाैली येथून महेंद्रनाथ पांडे यांचा सपाचे बिरेंद्र सिंह यांनी पराभव केला. तसेच उत्तर प्रदेशात राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी, साध्वी निरंजन ज्याेती, काैशल किशाेर, भानूप्रतापसिंह वर्मा पराभूत झाले.
महाराष्ट्रातून राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवार यांना पराभवाचा धक्का बसला. पश्चिम बंगालमधून राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि सुभाष सरकार यांना पराभवाचा सामना करावा लागला.
केरळमध्ये तिरुवनंतपूरम येथून राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचा काॅंग्रेसचे शशी थरुर यांनी पराभव केला. केरळमध्ये व्ही. मुरलीधरन, राजस्थानात कैलाश चाैधरी, कर्नाटकात भगवंत खुबा, तामिळनाडूत एल. मुरुगन, बिहारमधून संजीव बाल्यान पराभूत झाले.
तुरुंगातून लढले, विजयी झाले
यावेळी लाेकसभा निवडणुक लढविणाऱ्यांत काही उमेदवार असे हाेते ज्यांनी तुरुंगातून निवडणूक लढविली. विशेष म्हणजे, ते जिंकले. टेरर फंडिंगच्या आराेपात २०१९पासून तुरूंगात असलेले अब्दुल रशीद शेख उर्फ इंजीनिहर रशीद हे बारामुल्ला येथून
लढले. त्यांनी दाेन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा पराभव केला.
तर आसाममधील तुरुंगात कैद असलेला ‘वारिस दे पंबाज’चा प्रमुख अमृतपालसिंग याने पंजाबच्या खडुरसाहेब येथून निवडणूक लढविली. त्यानेही पावणेदाेन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळविला.