Lok Sabha Election Result 2024 : निवडणुकीत अखिलेश यादवांना सर्वाधिक फायदा; २५ वर्षांनंतर इतकं यश; ६ पट अधिक जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:13 PM2024-06-04T18:13:46+5:302024-06-04T18:14:33+5:30
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ४०० पारचा नारा घेऊन आलेल्या भाजपची निराशा होताना दिसत आहे. आत्तापर्यंतच्या कलांमध्ये ते जवळपास २४१ आणि एनडीए २९४ जागांवर आघाडीवर दिसत आहेत.
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ४०० पारचा नारा घेऊन आलेल्या भाजपची निराशा होताना दिसत आहे. आत्तापर्यंतच्या कलांमध्ये ते जवळपास २४१ आणि एनडीए २९४ जागांवर आघाडीवर दिसत आहेत. त्यामुळे बहुमतापासून ३२ जागा कमी पडल्या आहेत. तरीही एनडीएतील मित्रपक्षांच्या मदतीने ते सत्ता स्थापनेच्या वाटेवर आहेत. या निकालादरम्यान सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशकडे लागल्या आहेत.
अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष ३७ जागांवर आघाडीवर दिसून येतोय. या ट्रेंडचं निकालात रूपांतर झालं तर २५ वर्षांतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरेल. यापूर्वी १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सपानं लोकसभेच्या ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी ३६ खासदार जिंकले.
इतकंच नाही तर २००९ मध्ये त्यांची ही संख्या आकडा २३ होती. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या लाटेत त्यांना केवळ ५ जागा मिळू शकल्या होत्या. अशा तऱ्हेने यंदा ३७ जागा जिंकणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही ते ५ जागांवर थांबले होते. यानुसार पाहिलं तर कलांचं निकालात रुपांतर झाल्यास त्यांना ६ पट जास्त जागा मिळतील. या यशामुळे अखिलेश यादव यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावं लागले आणि २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि २०२२ मध्येही अखिलेश यादवांच्या पदरी निशारा आली होती.
त्यांची दहा वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता दिसून येतेय. त्यांचा पक्ष राज्यात सर्वाधिक जागा जिंकताना दिसत आहे. इतकंच नाही तर सपासोबत आलेल्या काँग्रेसला उत्तर प्रदेशातही बऱ्याच काळानंतर ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. या विजयासह समाजवादी पक्षानेही मतांची टक्केवारी वाढवली आहे. यावेळी त्यांना ३२ टक्क्यांहून अधिक मतं मिळताना दिसताहेत. विशेष म्हणजे राज्यात ४१ टक्के मते मिळूनही भाजपला केवळ ३३ जागांवर आघाडी मिळवता आल्याचं दिसून येतंय.