Lok Sabha Election Result 2024 : सर्व १२१ अशिक्षित उमेदवारांना नाकारले, तुमच्या खासदाराचे शिक्षण किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 06:44 AM2024-06-07T06:44:22+5:302024-06-07T06:45:10+5:30
Lok Sabha Election Result 2024 : एडीआर अहवालानुसार, १७ नवनिर्वाचित लोकसभा सदस्य डिप्लोमाधारक आहेत आणि फक्त एक सदस्य ‘ केवळ साक्षर ‘ आहे.
नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १२१ ‘ अशिक्षित ‘ उमेदवार उभे होते. या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याचे एडीआर अहवालातून समोर आले आहे. या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांपैकी सुमारे १०५ किंवा १९ टक्के उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता ५ वी ते १२ वी दरम्यान असल्याचे घोषित केले आहे, तर नवनिर्वाचित सदस्यांपैकी ४२० किंवा ७७ टक्के उमेदवारांनी पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतल्याचे जाहीर केले आहे.
पाचवी शिकलेले दोन उमेदवार
एडीआर अहवालानुसार, १७ नवनिर्वाचित लोकसभा सदस्य डिप्लोमाधारक आहेत आणि फक्त एक सदस्य ‘ केवळ साक्षर ‘ आहे.
- २ विजयी उमेदवारांचे शिक्षण इयत्ता पाचवी पर्यंत आहे.
- ४ खासदारांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे.
- ३४ विजय उमेदवारांनी १० वी पर्यंत शिक्षण घेतले आहे.
- ६५ सदस्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे..
पाचवी ते १० वी उत्तीर्ण १०५ खासदार
पाचवी ते १० वी उत्तीर्ण उमेदवार हे १०५ असून हे प्रमाण १९ टक्के इतके आहे. पदवीपुढील विजयी उमेदवार ४२० आहेत. हे प्रमाण ७७ टक्के इतके आहे. तर पराभूत झालेले निरक्षर उमेदवार हे १२१ असल्याचे एडीआर अहवालात म्हटले आहे.
खासदारांचा व्यवसाय काय?
१ ल्या लोकसभेपासून ११ व्या लोकसभेपर्यंत (१९९६-९८) पदवीधर पदवी धारण करणाऱ्या खासदारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नवीन लोकसभेतील पाच टक्के खासदारांकडे डॉक्टरेट पदवी आहे, त्यापैकी तीन महिला आहेत.
या निवडणुकीत लोकसभेवर निवडून आलेल्या ५४३ खासदारांपैकी बहुतांश सदस्यांनी शेती आणि समाजसेवा हा त्यांचा व्यवसाय असल्याचे जाहीर केले आहे. अठराव्या लोकसभेतील सुमारे सात टक्के सदस्य वकील आहेत आणि चार टक्के वैद्यकीय व्यवसायातील आहेत.