उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 01:57 PM2024-06-06T13:57:57+5:302024-06-06T14:21:54+5:30

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमधील भाजपा नेत्यांची आज दिल्लीत बैठक आहे.

lok sabha election result 2024 BJP called a meeting in Delhi on Uttar Pradesh result | उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग

उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला ६२ जागा मिळाल्या होत्या. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला फक्त ३३ जागा मिळाल्या आहेत.  दरम्यान, आता उत्तर प्रदेशमधील भाजपा नेत्यांची आज दिल्लीत बैठक आहे. दिल्लीत आधी यूपीबाबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठकही त्यांच्यासोबत असतील. प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरीही बैठकीत असणार आहेत. 

या बैठकीत उत्तर प्रदेशातील भाजपच्या कामगिरीवर चर्चा होणार आहे. यूपीच्या बैठकीनंतर भाजपच्या संसदीय पक्षाचीही बैठक होणार आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड होणार आहे. येथेही निवडणूक निकालांवर मंथन होऊ शकते.

उत्तर प्रदेशमधील ८० जागांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सीएम योगी आदित्यनाथपर्यंत सर्वांनी येथे आपली पूर्ण ताकद लावली होती. तरीही भाजपला फक्त ३३ जागा जिंकता आल्या. याआधी भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये ६२ जागांवर विजय मिळवला होता.पण, यावेळी सपाने आघाडी घेतली.

अयोध्या मतदारसंघात भाजपाचा सर्वात मोठा पराभव झाला आहे. भाजपने निवडणूक प्रचारात अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराचा सातत्याने उल्लेख करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही फैजाबादची अयोध्येची जागा भाजपने गमावली. येथे सपाने विजय नोंदवला. फैजाबादशिवाय अयोध्या विभागातील बाराबंकी, आंबेडकर नगर, सुलतानपूर आणि अमेठी या जागांवरही भाजपचा पराभव झाला. जवळच्या बस्ती आणि श्रावस्ती जागांवरही भाजपला विजय मिळवता आला नाही.

अमेठीच्या जागेलाही धक्का 

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली अमेठी लोकसभेची जागा २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने जिंकली होती. या जागेवर स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली आहे. काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना संधी दिली, त्यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी यांचा पराभव केला.

Web Title: lok sabha election result 2024 BJP called a meeting in Delhi on Uttar Pradesh result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.