Lok Sabha Election Result 2024 : इंदूरच्या भाजप उमेदवाराचा १० लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय, नोटानंही केला विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:39 PM2024-06-04T19:39:17+5:302024-06-04T19:40:17+5:30
Lok Sabha Election Result 2024 Madhya Pradesh : इंदूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारानं आज एक विक्रम केला. इतकंच नाही, तर या ठिकाणी नोटानंही विक्रम केला आहे.
Lok Sabha Election Result 2024 Madhya Pradesh : इंदूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारानं आज एक विक्रम केला. इतकंच नाही, तर या ठिकाणी नोटानंही विक्रम केला आहे. भाजपचे शंकर लालवानी १०,०८,०७७ मतांनी विजयी झाले. शंकर लालवानी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून विक्रम तर रचलाच, पण भाजपनं ही जागा ३५ वर्षे आपल्याकडेच ठेवली आहे. इंदूरमध्ये आपल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस पहिल्यांदाच निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडली होती. शंकर लालवानी यांना १२ लाख २६ हजार ७५१ मते मिळाली. लालवानी यांचे प्रतिस्पर्धी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार संजय सोळंकी यांना ५१ हजार ६५९ मते मिळाली.
'नोटा'ला विक्रमी मते
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असलेल्या २९ एप्रिल रोजी काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बाम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि लगेचच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघाच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडली. यानंतर काँग्रेसनं स्थानिक मतदारांना ईव्हीएमवरील 'नोटा'चं बटण दाबून भाजपला धडा शिकवण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी इंदूरमध्ये नोटाला २ लाख १८ हजार ६७४ मतं मिळाली, हा एक विक्रम आहे.
लालवानी काय म्हणाले ?
शंकर लालवानी यांनी आपल्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिलं. इंदूरमधील भाजपचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या 'नोटा'च्या आवाहनावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसनं नकारात्मक भूमिका घेतली असल्याचं ते म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लालवानी यांनी त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पंकज संघवी यांचा ५.४८ लाख मतांनी पराभव केला होता. खासदारकीच्या नव्या कार्यकाळात वाहतूक, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण या क्षेत्रांना प्राधान्य देऊन इंदूरमध्ये काम असल्याचंही लालवानी म्हणाले.