Lok Sabha Election Result 2024 : भाजप ‘इंडिया’वर भारी, इंडिया आघाडीने २३४ तर भाजपने जिंकल्या २४० जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 11:39 AM2024-06-06T11:39:53+5:302024-06-06T11:39:56+5:30
Lok Sabha Election Result 2024 : भाजपला सर्वाधिक यश मिळाले ते देशाच्या मध्यवर्ती भागात. पश्चिमेकडील गुजरातपासून ते राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशात भाजपला दमदार यश मिळाले.
नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालात भाजपसह एनडीएने एकूण २९२ जागा जिंकत आघाडी घेतली असली, तरी इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकत कडवे आव्हान दिले. दोन्ही गटातील घटकपक्षांची आकडेवारी लक्षात घेता, पक्षीय बलाबलाचा विचार करत एकट्या भाजपने जिंकलेल्या २४० जागा या एकूण इंडिया आघाडीच्या २३४ जागांच्या तुलनेत अधिक आहेत. त्यामुळे निकालात भाजपने बाजी मारल्याचा आणि त्यांनी एकट्याने संपूर्ण इंडिया आघाडीवर मात केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
सर्वाधिक यश कुठे?
भाजपला सर्वाधिक यश मिळाले ते देशाच्या मध्यवर्ती भागात. पश्चिमेकडील गुजरातपासून ते राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशात भाजपला दमदार यश मिळाले. उत्तरेत दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पैकीच्या पैकी जागा मिळवल्या. त्याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळमध्ये मिळालेल्या जागा हा भाजपसाठी बोनस ठरल्या. ईशान्येकडील राज्यांनीही भाजपला चांगली साथ दिली. या सर्वांच्या बळावर एकट्या भाजपला २४० पर्यंत मजल मारता आली. त्यातही मित्रपक्षांना सोबतीला घेत एनडीएची मजल २९२ जागांपर्यंत पोहोचल्याने सत्तानाट्याच्या स्पर्धेत ते आघाडीवर आहेत.
काँग्रेसमध्ये आनंद का?
इंडिया आघाडी जिंकलेल्या जागांचा विचार केल्यास, कॉंग्रेसने देशभरात ९९ जागांवर यश मिळवित, सर्वांत मोठा पक्ष ठरला. काँग्रेसच्या या यशात साथ दिली ती केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांनी. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेस १ वरून १३ वर पोहोचणे आणि २०१९ मध्ये ५२ जागांवरून ९९ पर्यंत मजल मारणे ही काँग्रेससाठी आत्मविश्वास वाढविणारी बाब आहे. त्याशिवाय इंडियातील प्रमुख घटकपक्ष असलेल्या सपाने उत्तर प्रदेशात जिंकलेल्या ३८, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या २९, बिहारमध्ये राजदच्या ४ आणि अन्य घटकपक्षांच्या मदतीने इंडिया आघाडीने २३४ जागांपर्यंत मजल मारली.