Lok Sabha Election Result 2024 : भाजपची मदार आता मित्रांच्या सहकार्यावर, चार राज्यांमध्ये मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 06:50 AM2024-06-05T06:50:49+5:302024-06-05T06:51:27+5:30
Lok Sabha Election Result 2024 : तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला एनडीएमधील घटक पक्षांवर पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात विसंबून राहावे लागणार आहे. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे तसेच रा. स्व. संघाची नाराजीही त्या पक्षाला भोवली आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) चंद्राबाबू नायडू व जनता दल (युनायटेड)चे नितीशकुमार आता किंगमेकर बनले आहेत. त्या दोन नेत्यांच्या पाठिंब्याविना भाजपला केंद्रात सरकार स्थापन करता येणे अशक्य आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वांत मोठा फटका उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात बसला आहे.
मोदींच्या लोकप्रियतेवर अवलंबून राहिला भाजप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तसेच त्यांची लोकप्रियता यावर भाजप वाजवीपेक्षा अधिक अवलंबून राहिला, हे त्या पक्षाच्या पीछेहाटीचे मुख्य कारण असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते. स्थानिक लोकांची नाराजी पत्करून तेथील लोकसभा मतदारसंघांमध्ये अन्य ठिकाणच्या लोकांना भाजपने उमेदवारी दिली. त्याचाही फटका भाजपला बसला. काही मतदारसंघात याआधी दोनदा विजयी ठरलेल्या भाजप उमेदवारांनाही हार पत्करावी लागली आहे. मोदी यांच्यावर सर्वस्वी अवलंबून राहाणे, कार्यकर्त्यांनी फार सक्रिय न होणे, याचा तडाखाही भाजपला बसला.
निवडणुकीपासून दूर राहिले संघाचे स्वयंसेवक
भाजपच्या प्रचारकार्यासाठी या लोकसभा निवडणुकीत रा. स्व. संघाचे कार्यकर्ते मैदानात उतरले नाहीत. भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा नुकतेच म्हणाले होते की, आता भाजपला रा. स्व. संघाची आवश्यकता नाही. भाजप आता स्वबळावर काम करत आहे. या विधानामुळे संघामध्ये तीव्र नाराजी पसरली. नागपूरपासून दिल्लीपर्यंत निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहाण्याच्या सूचना संघाच्या स्वयंसेवकांना देण्यात आल्या होत्या. स्थानिक स्तरावर उमेदवारांबद्दल नाराजी, महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे बनले. त्यामुळे भाजपची पीछेहाट झाली. मोदी यांची गॅरंटी, गरीब कल्याण योजना, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने भाजपला याचा लाभ मिळू शकला नाही.
अयोध्या राम मंदिराचा मुद्दाही प्रभावी ठरला नाही
‘अब की बार, ४०० पार’ असा नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते गाफील राहिले. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जणूकाही त्याचवेळी लोकसभा निवडणुका आहेत, असे कोणालाही वाटावे, अशा पद्धतीने गाजावाजा करण्यात आला. राम मंदिराच्या मुद्यावर अवलंबून राहाणे हेदेखील भाजपला महागात पडले. उत्तर प्रदेशातही या मंदिराचा मुद्दा प्रभावी ठरला नाही. खुद्द अयोध्येत भाजपला पराभव पत्करावा लागला.