Lok Sabha Election Result 2024 : हिंदी भाषिक पट्ट्याने बिघडविले भाजपचे गणित, इंडिया आघाडीला मिळाली साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 10:45 AM2024-06-06T10:45:51+5:302024-06-06T10:46:17+5:30

Lok Sabha Election Result 2024 : उत्तरप्रदेशमधील २९ जागांसह हिंदी भाषिक राज्यांमध्ये पक्षाने एकूण ४९ जागा गमावल्या.

Lok Sabha Election Result 2024: Hindi-speaking belt spoils BJP's calculations, India Aghadi gets support | Lok Sabha Election Result 2024 : हिंदी भाषिक पट्ट्याने बिघडविले भाजपचे गणित, इंडिया आघाडीला मिळाली साथ

Lok Sabha Election Result 2024 : हिंदी भाषिक पट्ट्याने बिघडविले भाजपचे गणित, इंडिया आघाडीला मिळाली साथ

नवी दिल्ली : गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तरप्रदेशपासून ते बिहारपर्यंत हिंदी भाषिक पट्ट्यात मोठा विजय मिळविला. २०२४ च्या निवडणुकीत पक्षासाठी परिस्थिती वेगळी आहे. उत्तरप्रदेशमधील २९ जागांसह हिंदी भाषिक राज्यांमध्ये पक्षाने एकूण ४९ जागा गमावल्या.

भाजपने राजस्थानमध्ये १० आणि हरयाणा व बिहारमध्ये प्रत्येकी ५ जागा गमावल्या आहेत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांत भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा चांगले यश मिळविले. राजस्थानमध्ये गतवर्षी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवूनही भाजपने यंदा १० जागा गमावल्या. 

जाट पट्ट्यात पक्षाचा मोठा पराभव झाला. आदिवासी मतदारांनीही नवीन भारत आदिवासी पक्षावर विश्वास दाखवल्याने भाजपने २०१९ मध्ये जिंकलेली बांसवाडा जागा गमावली. मागासवर्गीय मतदारांचा एक भागही भाजपपासून दूर गेल्याने भरतपूर व करौली-धोलपूरसारख्या जागा गमावल्या.

ज्येष्ठ नेते राहिले दूर
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह निवडणूक लढवत असलेल्या झालावाडच्या जागेशिवाय इतरत्र प्रचार केला नाही. चुरू मतदारसंघात भाजप खासदार राहुल कासवान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते जिंकले. 

अंतर्गत कुरघोडींचाही बसला फटका
हरयाणामध्ये जाट आणि शेतकरी पक्षाच्या विरोधात राहिले. मात्र, पक्षाच्या अनेक उमेदवारांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदारांच्या असहकाराचा मुद्दा उपस्थित केला. 
सिरसा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अशोक तंवर यांनी उघडपणे पक्षाच्या काही नेत्यांवर पक्षासाठी काम न केल्याचा आरोप केला. सोनीपत, अंबाला आणि हिसारसारख्या इतर जागांवरही हीच स्थिती होती. बिहारमध्ये भाजप नेते मोठ्या प्रमाणात ‘मोदी मॅजिक’वर अवलंबून होते. 

उत्तर प्रदेशमुळे बिघडले समीकरण
सुरुवातीच्या पक्षाच्या अहवालांनुसार, उत्तरप्रदेशात अनेक विद्यमान खासदारांविरुद्ध नाराजी होती आणि भाजप यात अनेक बदल करेल अशी अपेक्षा होती. पक्षाने काही बदल केलेही. पण, सलग दोन वेळा जिंकणाऱ्या खासदारांना त्यांनी यंदा पुन्हा उमेदवारी दिली. 
पंतप्रधान मोदींची गॅरंटी आणि व्यापक प्रचारामुळे भाजपला विश्वास होता की, ते विद्यमान उमेदवारांविरुद्ध असलेल्या सत्ताविरोधी लाटेवर मात करतील. मात्र, तसे झाले नाही आणि पक्षाचे मोठे नुकसान झाले. 

२५%  जागा झाल्या कमी 
राज्य          जागा    मतांची टक्केवारी 

    २०१९     २०२४     २०१९     २०२४ 
उत्तर प्रदेश     ६२     ३३     ४९.६     ४१.४
मध्य प्रदेश     २८     २९     ५८.०     ५९.३
गुजरात     २६     २५     ६२.२     ६१.९
राजस्थान     २४     १४     ५८.५     ४९.२
बिहार     १७     १२     २३.६     २०.५
हरयाणा     १०     ५     ५८.०     ४६.१
छत्तीसगड    ९     १०     ५०.७     ५२.७
दिल्ली    ७    ७     ५६.६     ५४.४
उत्तराखंड    ५    ५     ६१.०     ५६.८
हिमाचल    ४    ४     ६९.१     ५६.४ 
एकूण     १९२     १४४     ५०.४     ४५.४


या राज्यांत १३ जागा घटल्या
राज्य          जागा    मतांची टक्केवारी 

    २०१९    २०२४    २०१९    २०२४
कर्नाटक    २५    १७    ५१.४    ४६.१
महाराष्ट्र    २३    ९    २७.६    २६.१
प. बंगाल    १८    १२    ४०.३    ३८.७
झारखंड    ११    ८    ५१.०    ४४.६
आसाम    ९    ९    ३६.१    ३७.४
ओडिशा    ८    २०    ३८.४    ४५.३
तेलंगणा    ४    ८    १९.५    ३५.१
त्रिपुरा    २    २    ४९.०    ७०.७
अरुणाचल    २    २    ५८.२    ४८.९
मणिपूर    १    ०    ३४.२    १६.६
आंध्र प्रदेश    -    ३    १.०    ११.३
मिझोराम    -    ०    ५.७    ६.८
मेघालय    -    ०    ७.९    -
सिक्किम    -    ०    ४.७    ५.१
एकूण    १०३    ९०    ३२.८    ३४.३
 

Web Title: Lok Sabha Election Result 2024: Hindi-speaking belt spoils BJP's calculations, India Aghadi gets support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.