कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:18 AM2024-06-04T05:18:31+5:302024-06-04T05:20:02+5:30

Lok Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज, सकाळी ८ पासून सुरुवात 

Lok Sabha Election Result 2024 : How is the winning candidate of the Lok Sabha determined? How are votes counted?; Election Commission system ready, starting from 8 am  | कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?

कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?

मुंबई : एकूण सात टप्प्यांत पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. देशाची १८ वी लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. एकूण ५४३ मतदारसंघातील उमेदवारांचे आणि देशाचे भवितव्य ठरणार आहे. ४  जून रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरू होणारी मतमोजणी कशा प्रकारे पार पडणार, हे जाणून घेऊ या.

व्हीव्हीपॅटमधील स्लिप कधी मोजल्या जातात?
मतदान अचूक होते की नाही याची खात्री म्हणून व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो. यामध्ये मतदान केल्यानंतर  स्लिप व्हीव्हीपॅटमध्ये पडते. यावर उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि निशाणी छापलेली असते. 
मतांबाबत उमेदवारांनी शंका घेतल्यास किंवा चुकीची गणना केल्याचा आरोप असल्यास, व्हीव्हीपॅटमधील स्लिप मोजल्या जातात. अशा ठिकाणी  व्हीव्हीपॅट पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर केला जातो.

किती वाजता सुरू होते मतमोजणी?  
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात केली जाते.  राजकीय पक्ष व उमेदवारांनी नियुक्त केलेले मतदान अधिकारी, मतमोजणी एजंट सकाळी ५ वाजण्यापूर्वी मतमोजणी केंद्रावर पोहोचतात आणि सकाळी ६  वाजेपर्यंत मतमोजणी टेबलवर उपस्थित राहू शकतात.

मतमोजणीची जबाबदारी कुणावर?  
मतदारसंघात निवडणूक आणि मतमोजणी घेण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी अर्थात रिटर्निंग ऑफिसरची असते. निवडणूक निर्णय अधिकारी हा सामान्यतः सरकारी अधिकारी असतो किंवा राज्य सरकारच्या सल्लामसलतीने प्रत्येक मतदारसंघासाठी  निवडणूक आयोगाद्वारे नामनिर्देशित केलेला स्थानिक प्राधिकारी असतो.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली मतमोजणी केली जाते. तथापि, एका मतदारसंघासाठी अनेक ठिकाणी मतमोजणी होत असल्यास सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली देखील मतमोजणी होऊ शकते. 

मतमोजणी कुठे केली जाते? 
प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक पार पाडण्यासाठीची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर असून या अधिकाऱ्यांकडून मतमोजणीसाठी सरकारी शाळा, महाविद्यालये अथवा सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणे ठरवली जाऊ शकतात. मतमोजणी सामान्यतः एकाच सभागृहात होते. आयोगाकडून पूर्वपरवानगी घेऊन मतमोजणी हॉल आणि टेबल्सची संख्या वाढवली जाऊ शकते. 

प्रत्येक फेरीत किती मतमोजणी?
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत १४ ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाते. 
पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी ३० मिनिटांत सुरू होते. 
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीच्या समाप्तीनंतर, १४ ईव्हीएममधील मतांच्या मोजणीतून गोळा केलेले निकाल जाहीर केले जातात. 

कोण राहू शकतात उपस्थित?    
निवडणूक निर्णय अधिकारी तीन टप्प्यांची प्रक्रिया वापरून मोजणी पर्यवेक्षकांची नियुक्ती करतो.
मतमोजणी सभागृहात उमेदवार, त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक प्रतिनिधी उपस्थित राहतात. 

४,३०९ टेबलवर होणार राज्यातील मतमोजणी 
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण १४,५०७ अधिकारी-कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉलमध्ये ४,३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी होईल. ही मोजणी संपल्यानंतर मतदान यंत्रातील मतमोजणी होईल. सुमारे एक लाख ते सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या मदतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

Web Title: Lok Sabha Election Result 2024 : How is the winning candidate of the Lok Sabha determined? How are votes counted?; Election Commission system ready, starting from 8 am 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.