Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया आघाडी’ तूर्त विरोधकांच्या भूमिकेत, बैठकीनंतर दिले संकेत, सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 06:19 AM2024-06-06T06:19:54+5:302024-06-06T06:21:25+5:30
Lok Sabha Election Result 2024 : भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना कोणती पदे दिली जातात. त्यानंतरच इंडिया आघाडी पुढील रणनीती आखणार आहे.
- आदेश रावल
नवी दिल्ली : निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पार पडली. इंडिया आघाडी सध्यातरी विरोधी पक्षात बसणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून देण्यात आले आहेत.
इंडिया आघाडी केंद्रात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही, असा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.
बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, भाजप सरकारला देशातील जनतेने नाकारले आहे. असे असतानाही आम्ही देशातील उर्वरित पक्षांना असे आवाहन करतो की, भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेवर अतूट विश्वास असलेले पक्ष आणि आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाच्या उद्देशाने कटिबद्ध असलेले पक्ष यांचे आम्ही स्वागत करतो. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना कोणती पदे दिली जातात. त्यानंतरच इंडिया आघाडी पुढील रणनीती आखणार आहे.