Lok Sabha Election Result 2024 : मोदी यांचे ५० देशांकडून अभिनंदन, भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्यावर दिला भर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 11:45 AM2024-06-06T11:45:23+5:302024-06-06T13:52:47+5:30
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयाबद्दल मोदी यांचे जगातील विविध देशांतल्या ५० नेत्यांनी अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत एनडीएला सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील तिसऱ्यांदा या पदावर विराजमान होणार असून त्यांचा या आठवड्यात शपथविधी होईल. लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयाबद्दल मोदी यांचे जगातील विविध देशांतल्या ५० नेत्यांनी अभिनंदन केले आहे.
श्रीलंका, मालदीव, इराण, सेशेल्स या देशांचे राष्ट्राध्यक्ष व नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार, मॉरिशसच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांचे निवडणुकांतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांनी म्हटले आहे की,सिंगापूर, भारत यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याच्या घटनेस पुढच्या वर्षी ६० वर्षे पूर्ण होणार आहेत.
मेलोनी म्हणाल्या...
जी-२० गटातील देशांपैकी इटली, जपानचे पंतप्रधान, दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी लोकसभा निवडणुकांतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केेले आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, भारत व इटलीतील संबंध आणखी दृढ होण्याकरिता तसेच सहकार्य वाढण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. नायजेरिया, केनिया, कोमोरोस तसेच कॅरेबियन बेटे, जमैका, बार्बाडोस, गियाना या देशांनीही मोदींचे अभिनंदन केले.
बायडेन, सूनक, मॅक्रॉन यांनीही केले अभिनंदन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. बायडेन यांनी म्हटले आहे की, भारतामधील ऐतिहासिक लोकसभा निवडणुकांत सुमारे ६५ कोटी लोकांनी मतदान केले. अमेरिका व भारतामध्ये घनिष्ठ मैत्री असून भविष्यात दोन्ही देशांतील सहकार्यात आणखी वाढ होणार आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. सूनक यांनी म्हटले आहे की, ब्रिटन व भारतातील मैत्री भावी काळात वृद्धिंगत होणार आहे.