Lok Sabha Election Result 2024 : नितीश कुमार, चंद्राबाबू म्हणणार, हुकमी एक्के आम्हीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 06:12 AM2024-06-05T06:12:22+5:302024-06-05T06:57:35+5:30
Lok Sabha Election Result 2024 : बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचा हात सोडून नितीशकुमार यांच्या जदयूने पाच महिन्यांपूर्वी एनडीएशी हातमिळवणी केली.
Lok Sabha Election Result 2024 : नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ऐनवेळी भाजप प्रणीत एनडीएत सामील होणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे आता 'किंग मेकर' या नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचा हात सोडून नितीशकुमार यांच्या जदयूने पाच महिन्यांपूर्वी एनडीएशी हातमिळवणी केली. तर, १० वर्षांपासून भाजपशी फटकून वागणाऱ्या चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पक्षानेही आंध्र प्रदेशात भाजपशी जुळवून घेतले. एनडीएच्या रथात ऐनवेळी बसलेल्या या दोन्ही पक्षांच्या ताटात भाजपने आपल्याकडील जागा वाढल्या. त्यानुसार बिहारमध्ये जदयूला १६ तर आंध्र प्रदेशात तेलुगू देसमला १६ जागा देण्यात आल्या.
बिहारी मतदारांनी केले जदयूवर शिक्कामोर्तब
नितीशकुमार यांच्या जदयूने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी बजावली. त्यांनी लढविलेल्या १६ पैकी १४ जागांवर जदयूचे उमेदवार विजयी झाले आहेत. केंद्रात एकट्या भाजपची वाटचाल २५०च्या आत अडल्याने आता सत्तास्थापनेवेळी एनडीएत नितीशकुमारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २ तिसऱ्या टर्ममध्ये नितीशकुमार व त्यांच्या पक्षाला महत्त्व द्यावे लागेल. जदयूला मंत्रिमंडळात चांगली खाती देऊन त्याची परतफेड केली जाऊ शकते. एनडीएत जाण्याच्या नितीशकुमार यांच्या निर्णयावर बिहारी मतदारांनी एका अर्थाने पसंतीचे शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट होत आहे.
एनडीएत येताच तेलुगू देसमची फिनिक्स भरारी
१ दहा वर्षांपासून सत्तेपासून दूर राहिलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. लोकसभेपूर्वी चंद्राबाबूंनी भाजपशी सूत जुळवून घेतले. आंध्र प्रदेशातील चंचुप्रवेशासाठी भाजपनेही त्यांना १६ जागा दिल्या, तसेच विधानसभेतही युतीही केली. या निर्णयावर मतदारांनी मान्यतेची मोहोर उमटवली आहे.
चंद्राबाबूंचे १६ खासदार निवडून आले आहेत. तर, विधानसभेतही तेलुगू देसमने निर्णायक आघाडी घेतली आहे. एक प्रकारची संजीवनीच या निकालांमुळे त्यांना मिळाली आहे. ३००च्या आत अडकलेल्या एनडीएत चंद्राबाबूंचे वजनही वाढणार आहे. त्यामुळे केंद्रात तेलुगू देसमला मानाचे पान मिळण्याची शक्यता वधारली आहे.