Lok Sabha Election Result 2024: प्रशांत किशोर की योगेंद्र यादव? कोणाचा Exit Poll ठरला खरा?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 02:15 PM2024-06-05T14:15:56+5:302024-06-05T14:16:13+5:30
Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आलेले अनेक एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. अनेक विद्यमान खासदारांना पराभव पत्करावा लागला. अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. महाराष्ट्रात तर महायुतीला अनेक ठिकाणी चितपट करत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. काँग्रेस पक्षाने जास्त जागा जिंकल्या. मात्र, मतमोजणीपूर्वी अनेकांनी एक्झिट पोल दिले होते. परंतु, जवळपास सगळ्यांचा अंदाज खोटा ठरल्याचे या निकालावरून दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
राज्य पातळीवर एनडीएला बहुमत असल्याचे चित्र असले तरी इंडियाने २३५ जागा जिंकत एक मोठे आव्हान उभे केले. ४०० पारचा नारा भाजपाकडून देण्यात आला होता. मात्र, एनडीएला २९४ जागांवर समाधान मानावे लागले. असे असले तरी भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला. भाजपाला २४० जागांवर विजय मिळाला. तर इंडिया आघाडीतील काँग्रेस मोठा पक्ष ठरला. काँग्रसेला देशभरात ९९ जागांवर विजय मिळाला. राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनीही अंदाज वर्तवला होता. तर योगेंद्र यादव यांनीही देशातील स्थिती कशी, असे याचे भाकित केले होते.
प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांचा Exit Poll काय होता?
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर वर्तवलेला अंदाज चुकीचा ठरला. भाजपा २०१९ पेक्षाही यंदा अधिक चांगल्या पद्धतीने बहुमत मिळवेल, असा अंदाज प्रशांत किशोर यांनी वर्तवला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०२ जागा जिंकल्या होत्या. तर दुसरीकडे राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी वर्तवलेला अंदाज मात्र काही प्रमाणात बरोबर ठरल्याचे बोलले जात आहे. भाजपाला जवळपास ७० जागांचा फटका बसू शकतो. भाजपाच्या जागा या लोकसभा निवडणुकीत ३०३ वरून २३३ वर येण्याची शक्यता आहे. एनडीएतील मित्रपक्षांना ३५ जागा मिळतील. त्यामुळे एनडीएचे या निवडणुकीतील संख्याबळ २६८ ते २७० पर्यंत जाईल. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीत भाजपाप्रणित एनडीएला तब्बल २० जागांचा फटका बसू शकतो, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला होता. महाराष्ट्रात एनडीएला २५ जागांचा फटका बसला आहे. तर, या लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २४० जागा मिळवता आल्या.
दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला १३, भाजपा ९, शिवसेना ठाकरे गट ९, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ८, शिवसेना शिंदे गट ७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १, अपक्ष १ अशा जागांवर उमेदवार निवडून आले.