Lok Sabha Election Result 2024 : महानगरांत ‘रालोआ’ची दमदार कामगिरी, ग्रामीण भागात इंडिया आघाडीचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 06:36 AM2024-06-05T06:36:10+5:302024-06-05T06:36:29+5:30
Lok Sabha Election Result 2024 : मुंबईने रोखली भाजपची घोडदौड; युतीची अनेक मतदारसंघांत आघाडी
Lok Sabha Election Result 2024 : नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) लोकसभा निवडणुकांत महानगरांत आपले सामर्थ्य दाखवले असून दिल्ली, बंगळुरू आणि पुणे यांसारख्या शहरी भागांत पुरेशी आघाडी मिळवली आहे. तथापि, महानगरांतील भाजपची ही घोडदौड मुंबईने रोखली. दुसरीकडे इंडिया आघाडीने ग्रामीण भागात आपली ताकद दाखवली असून, तेथील बहुतांश मते मिळवली आहेत.
दिल्लीत भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे असून, पक्षाचे उमेदवार शहरातील सातही मतदारसंघांत आघाडीवर आहेत. बंगळुरूतही हेच चित्र आहे. तेथील शहरी मतदारांनी मोठ्या प्रमाणात भाजप उमेदवारांच्या पारड्यात मते टाकली आहेत. पुण्यातही ‘रालोआ’साठी अनुकूल वातावरण पाहावयास मिळाले. तेथे युतीने शहरातील अनेक मतदारसंघांत आघाडी मिळवली आहे. यातून शहरी मतदारांतील भाजपची लोकप्रियता दिसून येते. याउलट, विविध विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियाचा ग्रामीण भागांत दबदबा दिसून आला.
छत्तीसगडमधील कोरबा आणि उत्तर प्रदेशातील आंवला, बस्ती, लालगंज यांसारख्या भागात इंडियाला लक्षणीय पाठिंबा मिळाला. यावरून शेतकरी वर्ग आणि ग्रामीण मतदारांवरील इंडिया आघाडीची पकड अधोरेखित होते. तथापि, ओडिशा, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारखी राज्ये याला अपवाद आहेत. तेथे ‘रालाेआ’ने ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत जवळपास क्लीन स्वीप केले आहे.