स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 08:44 AM2024-06-08T08:44:53+5:302024-06-08T08:44:57+5:30
Lok Sabha Election Result 2024 : सोनिया गांधी उत्तर द्या, ऐका सोनिया... एकेरी उल्लेखाने दुखावली होती मुले
- आदेश रावल
नवी दिल्ली : एका पत्रकाराने प्रियांका गांधींना प्रश्न विचारला होता की, प्रवीण तोगडिया हे सोनिया गांधी या परदेशी वंशाच्या महिला आहेत, असे म्हणत आहेत. तुम्हाला काय म्हणायचे आहे? प्रियांका गांधी त्यावेळी म्हणाल्या होत्या, कोण आहेत प्रवीण तोगडिया? मी ओळखत नाही. यावेळी अमेठीतही असेच घडले. प्रियांका यांनी कधीही स्मृती इराणींचे नाव घेतले नाही. खरेतर यामागची कहानी जाणून घेणे आवश्यक आहे. एके दिवशी संसदेत स्मृती इराणी यांनी असे शब्द वापरले, ज्यामुळे आईच्या मुलांचे मन दुखावले. स्मृती इराणी संसदेत म्हणाल्या होत्या, ‘सोनिया गांधी, सोनिया गांधी उत्तर द्या, ऐका सोनिया.’
इराणी यांच्या या भाषेची संसद आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. एका पक्षाच्या वयाने ज्येष्ठ अध्यक्षांविरुद्ध, यूपीएच्या एका नेत्याविरुद्ध आणि एका महिलेने दुसऱ्या महिलेविरुद्ध, अशी भाषा वापरायला नको होती. अर्थातच ही गोष्ट सोनिया गांधींच्या मुलांच्या मनात घर करून गेली हे कोणाच्याही लक्षात आले नाही. ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. अमेठी आणि रायबरेलीमधून कोण निवडणूक लढवणार हे शेवटपर्यंत गूढच बनलेले होते.
शर्मा यांची उमेदवारी कशी ठरली?
राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षांसह आई सोनिया गांधी यांचा सल्लाही मान्य करावा लागला की, रायबरेलीची जागा लढवावी, कारण ती जागा अध्यक्षांची आहे आणि राहुल गांधी माजी अध्यक्ष आहेत. अमेठीची जागा ठरविण्याची वेळ आली, तेव्हा निष्ठावंत आणि पक्षाचे छोटे कार्यकर्ते किशोरीलाल शर्मा यांनाच उमेदवारी द्यायची ठरले.
कोणता संदेश द्यायचा होता?
एका छोट्या कार्यकर्त्याने स्मृती इराणींचा निवडणुकीत पराभव केला, असा संदेश गांधी कुटुंबाला द्यायचा होता.
सोनिया गांधींच्या दोन्ही मुलांना ‘ऐका सोनिया, सोनिया उत्तर द्या’ सगळे लक्षात होते. प्रियांका गांधींनी अमेठी आणि रायबरेलीत ठाण मांडून दोन्ही जागा जिंकून आणल्या. पण, त्यांनी एकदाही स्मृती इराणींचे नाव घेतले नाही, जणू काही त्या त्यांना माहीतच नाही.