शरद पवार नाही, नितीशकुमार-चंद्राबाबुंना सोबत आणण्यासाठी युपीतील बड्या नेत्यावर जबाबदारी? दिल्लीला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:39 PM2024-06-05T12:39:21+5:302024-06-05T12:40:08+5:30

Lok sabha Election Result 2024 Update: देशात नवे सरकार कोणाचे असेल हे ठरविणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू दिल्लीसाठी निघाले आहेत. अशातच मोदींनी तिसऱ्यांदा सरकार बनविणार असल्याचा दावा केला आहे.

Lok sabha Election Result 2024 Update: No Sharad Pawar, Big leader from UP Akhilesh Yadav will help to bring Nitish Kumar-Chandrababu naidu along with india alliance, leaves for Delhi | शरद पवार नाही, नितीशकुमार-चंद्राबाबुंना सोबत आणण्यासाठी युपीतील बड्या नेत्यावर जबाबदारी? दिल्लीला रवाना

शरद पवार नाही, नितीशकुमार-चंद्राबाबुंना सोबत आणण्यासाठी युपीतील बड्या नेत्यावर जबाबदारी? दिल्लीला रवाना

देशात नवे सरकार कोणाचे असेल हे ठरविणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू दिल्लीसाठी निघाले आहेत. अशातच मोदींनी तिसऱ्यांदा सरकार बनविणार असल्याचा दावा केला आहे. नायडूंची टीडीपी आंध्रप्रदेशमध्ये सत्तेत येत आहे. यामुळे भाजपाला या दोघांसोबत तोडपाणी करावे लागणार आहे. या दोघांना आपल्या बाजुने वळविण्यासाठी इंडी आघाडीचे नेते प्रयत्न करू लागले आहेत. निकालाच्या दिवशी यासाठी शरद पवारांचे नाव आले होते. परंतु पवारांनी ते फेटाळले होते. आता ही जबाबदारी उत्तर प्रदेशच्या बड्या नेत्यावर सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये सपाने जबरदस्त मुसंडी मारत भाजपला बहुमतापासून रोखले आहे. आता तेथे बाजी मारल्यानंतर दिल्लीतील सत्तेचे दरवाजे उघडण्यासाठी अखिलेश यादव प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अखिलेश यादव, शरद पवार या दोघांचेही नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी चांगले संबंध आहेत. शरद पवारांनी आजच्या बैठकीनंतर पुढची रणनीती ठरविण्याचे म्हटले आहे. यामुळे भाजपाच्या कधीकाळी विरोधक असलेल्या नितीश आणि चंद्राबाबुंना आपल्याकडे वळविण्यासाठी अखिलेश आणि पवारांची ताकद वापरली जाण्याची शक्यता आहे. 

नितीशकुमार यांचे राजकारण समाजवादी राहिले आहे. या चळवळीतून पुढे आलेल्या नितीशकुमारांचे सपाचे संस्थापक मुलायम सिंहांसोबत जवळचे संबंध होते. इंडिया आघाडीची स्थापनाच नितीशकुमार यांच्या प्रयत्नांतून झाली होती. याला अखिलेश आणि शरद पवारांचा पाठिंबा होता. या नितीशकुमारांना पुन्हा इंडी आघाडीत आणण्यासाठी अखिलेश यादव मोठ्या भूमिकेत दिसणार आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. त्यावेळी चंद्राबाबू नायडू बिगर-काँग्रेस, बिगर भाजप तिसरी आघाडी स्थापन करण्याचा विचार करत होते. चंद्राबाबू नायडू यांनी 2019 मध्ये लखनौ दौऱ्यात अखिलेश आणि मायावती यांची भेट घेतली होती. त्यांना यश आले नाही तरी त्यांच्यामुळे अखिलेश आणि मायावती एकत्र निवडणूक रिंगणात उतरले होते. चंद्राबाबूंचा शब्द तेव्हा अखिलेश यांनी पाळला होता. हे संबंध अखिलेश यांना चंद्राबाबुंशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे मन वळविण्यासाठी उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. 

Web Title: Lok sabha Election Result 2024 Update: No Sharad Pawar, Big leader from UP Akhilesh Yadav will help to bring Nitish Kumar-Chandrababu naidu along with india alliance, leaves for Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.