Lok Sabha Election Result 2024 : "वाटाघाटी करणार नाही..," चिराग पासवान यांची मोठी घोषणा; PM मोदींबाबतही मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:57 PM2024-06-04T20:57:14+5:302024-06-04T20:58:21+5:30
Lok Sabha Election Result 2024 : हाजीपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकलेल्या चिराग पासवान यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. पासवान .यांच्या पक्षानं ५ पैकी ५ जागांवर विजय मिळवला आहे.
Lok Sabha Election Result 2024 : हाजीपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकलेल्या चिराग पासवान यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. आमचा पक्ष पंतप्रधान मोदींसोबत कोणत्याही प्रकारची बार्गेनिंग करणार नसल्याचं पासवान म्हणाले. चिराग पासवान यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. "आम्ही पंतप्रधानांना बिनशर्त पाठिंबा देऊ. जनतेनं एनडीए आघाडीला स्पष्ट जनादेश दिलाय. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार आहेत. त्याचबरोबर आमच्या पक्षाचे पाच खासदार विजयी होऊ शकले असतील तर ते एनडीए आघाडीमुळेच आहे," असंही ते म्हणाले.
अमित शाह यांचा फोन आला
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. ही तिसरी टर्म आपल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाला मोठ्या उंचीवर घेऊन जाईल, त्यांनी देशाला वचन दिलं आहे. आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असंही पासवन म्हणाले. त्याचबरोबर विकासासाठी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचं कामही हे सरकार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. "अमित शाह यांनी मला फोन केला होता. त्यांनी एनडीएच्या बैठकीची माहिती दिली. लोकजनशक्ती पार्टी रामविलास आणि आमचे सर्व खासदार एनडीएला पाठिंबा देतील," असंही त्यांनी जाहीर केलंय.
पाचही जागा जिंकल्या
विशेष म्हणजे एलजेपी-आरनं पाचही जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष लोजपानं (रामविलास) जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार हाजीपूर (एससी), वैशाली, जमुई (एससी), खगड़िया आणि समस्तीपूर (एससी) या पाच जागा जिंकल्या. हाजीपूर मतदारसंघात लोजपा-आरचे उमेदवार चिराग पासवान यांनी त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी राष्ट्रीय जनता दलाचे शिवचंद्र राम यांचा पराभव केला. समस्तीपूरमध्ये शांभवी चौधरी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सनी हजारी यांचा पराभव केला. जमुईमध्ये अरुण भारती यांनी राजदच्या अर्चना कुमारी, त्याचप्रमाणे वैशाली लोकसभा मतदारसंघातून लोजपा-आरच्या उमेदवार वीणा देवी यांनी राजद उमेदवार माजी आमदार विजय कुमार शुक्ला उर्फ मुन्ना शुक्ला यांचा पराभव केला. तर खगड़ियामध्ये राजेश वर्मा यांनी माकपचे उमेदवार संजय कुमार यांचा पराभव केला.