लालूंचा नवा प्रयोग झाला फेल, दोन नवे चेहरे वगळता कन्या राेहिणीसह सर्वांचा झाला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 05:59 AM2024-06-09T05:59:07+5:302024-06-09T06:00:02+5:30
Lok Sabha Election Result 2024:: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा करिष्मा कामी आला नाही. आरजेडीने बक्सरमधून सुधाकर सिंह आणि औरंगाबादमधून अभय कुशवाह हे नवे चेहरे उतरवले होते. हे दोघे वगळता सर्वच नव्या चेहऱ्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
- एस. पी. सिन्हा
पाटणा - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा करिष्मा कामी आला नाही. आरजेडीने बक्सरमधून सुधाकर सिंह आणि औरंगाबादमधून अभय कुशवाह हे नवे चेहरे उतरवले होते. हे दोघे वगळता सर्वच नव्या चेहऱ्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
यावेळी लालू यादव यांनी आपली कन्या रोहिणी आचार्य यांना सारणमधून उमेदवारी दिली होती. भाजपचे राजीव प्रताप रुडी यांनी त्यांचा १३,६६१ मतांनी पराभव केला. त्याचप्रमाणे नवादामधून यादव जातीचा उमेदवार उभा करण्याऐवजी आरजेडीने श्रावण कुशवाह या तरुणाला उमेदवारी दिली. भाजपचे उमेदवार विवेक ठाकूर यांनी कुशवाह यांचा पराभव केला. सुपौल मतदारसंघात आरजेडीचे चंद्रहास चौपाल, शिवहरमध्ये आरजेडीच्या रितू जैस्वाल अर्चना रविदास यांना जमुई येथून पराभव स्विकारावा लागला. आरजेडीने सीमावर्ती भागातील नेते तस्लिमुद्दीन यांच्या धाकट्या मुलाला अररिया लोकसभेतून उमेदवारी दिली होते. येथेही भाजपचे प्रदीप कुमार सिंह यांनी त्यांचा पराभव केला.
या उमेदवारांचाही पराभव
आरजेडीच्या कुमार सर्वजीत यांना गया लोकसभेत ‘हम’ पक्षाचे उमेदवार माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. आरजेडीने बाहुबली अशोक महतो यांची पत्नी अनिता कुमारी यांना मुंगेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, परंतु जेडीयूच्या लालन सिंह यांनी त्यांचा पराभव केला. मधेपुरामधून आरजेडीच्या प्रा. कुमार चंद्रदीप यांचा जेडीयूचे उमेदवार दिनेश चंद्र यादव यांनी १,७४,५३४ मतांनी पराभव केला.