लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपाच्या अभूतपूर्व यशावर सचिन तेंडुलकरचा 'मास्टर' स्ट्रोक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 08:48 PM2019-05-23T20:48:39+5:302019-05-23T20:49:50+5:30
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निडवणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करताना एकहाती सत्तेच्या दिशेनं कूच केली आहे.
मुंबई : भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निडवणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करताना एकहाती सत्तेच्या दिशेनं कूच केली आहे. सध्या हाती असलेल्या आकडेवारीनुसार भाजपा सरकार 349 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्ष भाजपाचीच सत्ता असणार आहे, हे निश्चितच आहे. भाजपाच्या या अभूतपूर्व यशावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विट केले आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे कौतुक केले आहे.
तो म्हणाला, नरेंद्र मोदीजी आणि भाजपा यांच्या अभूतपूर्व यशाचे कौतुक. नवीन भारताच्या बांधणीसाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे.''
My heartiest congratulations to @narendramodi Ji & @BJP4India for winning the #LokSabhaElections2019.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 23, 2019
The nation is with you in building a brighter and stronger New India 🇮🇳.
गौतम गंभीर, राज्यवर्धन राठोड विजयाच्या उंबरठ्यावर; काँग्रेसचे तीनही खेळाडू बाद
लोकसभा निडवणुकीत उभे राहिलेल्या पाच खेळाडूंमध्ये माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर व ऑलिम्पिकपटू नेमबाज राज्यवर्धन राठोड यांनी विजयाच्या दिशेने कूच केली आहे. माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद, बॉक्सर विजेंदर सिंग आणि थाळीफेकपटू कृष्णा पुनिया हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलेल्या खेळाडूंचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.
2011च्या वर्ल्ड कप विजयात गंभीरची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आहेत. त्याला पद्म श्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. भाजपाच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून उभ्या राहिलेल्या गंभीरने 04.30 वाजेपर्यंत 5 लाख 74 हजार 213 मतांसह विजयाच्या दिशेने कूच केली आहे. त्याच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या अरवींद सिंग लवली यांना 2 लाख 66 हजार 776 मतं मिळवली, तर आम आदमी पार्टीच्या आतिषी यांना 1 लाख 85 हजार 474 मतं मिळवली.
दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगला कसेबसे तिसरे स्थान पटकावता आलेले पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात भाजपाच्या रमेश बिधुरी यांनी 5 लाख 55 हजार 294 मतं मिळवली आहेत. आम आदमी पार्टीचे राघव चढा ( 2,55, 641) दुसऱ्या, तर विजेंदर ( 1, 38, 391) तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत विजेंदरने कांस्यपदक जिंकले होते. लोकसभा निडवणूकीत लढण्यासाठी विजेंदरने हरयाणा पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा दिला होता.
राजस्थानमधील जयपूर ग्रामीण मतदारसंघात दोन ऑलिम्पिकपटूंमध्ये स्पर्धा होती. सध्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री आणि 2004च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता नेमबाज राज्यवर्धन राठोड याच्यासमोर काँग्रेसच्या तिकीटावर उभी असलेली कृष्णा पुनियाने आव्हान उभे केले आहे. पूनियाने 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत थाळीफेकीत सुवर्णपदक जिंकले होते. शिवाय तीने तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. राज्यवर्धन यांनी 2002 आणि 2006च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 25 पदकांची कमाई केली आहे. पुनियाला 2011मध्ये पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पण, राजकारणाच्या रिंगणात पुनियाला अपयश आलेले पाहायला मिळत आहे. राठोड यांनी 8 लाख 11 हजार 626 मतांसह मोठी आघाडी घेतली आहे, पुनियाला 4 लाख 22 हजार 223 मतं मिळवता आली.
भारताचे माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी भाजपाची साथ सोडून यंदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड येथील धनबाद मतदार संघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आझाद हे 1983च्या वर्ल्ड कप संघातील सदस्य होते. आझाद यांनी दुसऱ्या क्रमांकाची 2 लाख 39 हजार 992 मतं मिळवली आहेत. येथे भाजपाच्या पशुपथी नाथ सिंग यांनी 5 लाख 41 हजार 924 मतं जिंकलेली आहेत.