कौतुकास्पद! वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून त्यांनी बजावला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:45 PM2019-05-06T13:45:51+5:302019-05-06T13:47:33+5:30
दु:खाचा डोंगर कोसळूनही मतदान करण्यास आलेल्या मुलाचं सोशल मीडियावर कौतुक
छतरपूर: मध्य प्रदेशातल्या छतरपूरमध्ये आज मतदान सुरू आहे. यावेळी एका मतदारानं सर्वांचं लक्ष वेधलं. वडिलांचे अंत्यसंस्कार आटपून मतदान करण्यासाठी आलेल्या या व्यक्तीचं सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे. पांढरा पंचा नेसून, डोक्यावरचे केस काढून ही व्यक्ती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचली. त्यांना पाहून मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि मतदारांना आश्चर्याचा धक्का बसला.
मध्य प्रदेशातल्या लोकसभेच्या 7 जागांवर आज मतदान सुरू आहे. यात तिकमगढ, दामोह, खजुराहो, सतना, रेवा, होशांगबाद, बेतुल या मतदारसंघांचा समावेश आहे. यातील खजुराहो मतदारसंघातल्या छतरपूरमधील मतदान केंद्रावर सकाळी एक व्यक्ती मतदानाला पोहोचली. पांढरा पंचा नेसून ही व्यक्ती मतदान करण्यासाठी रांगेत उभी होती. वडिलांचा अंत्यनिधी पार पाडून तातडीनं या व्यक्तीनं मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी अनेकजण असंख्य कारणं देत असताना वडिलांच्या निधनानंतरही मतदानाचा हक्क बजावणाऱ्या या व्यक्तीचं सध्या सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे.
Madhya Pradesh: A man in Chhatarpur arrives to vote, after his father's last rites earlier today. #LokSabhaElections2019#Phase5pic.twitter.com/99YoCEJ7Ch
— ANI (@ANI) May 6, 2019
याआधी झारखंडमधल्या हजारीबागमध्ये एका 105 वर्षीय महिलेनं मतदान केलं. ही महिला तिच्या मुलासह मतदान केंद्रावर आली होती. त्यांचा मुलगा खांद्यावरुन त्यांना घेऊन आला होता. वयाच्या 105 व्या वर्षीदेखील मतदानाचा हक्क बजावणाऱ्या या महिलेला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. आज देशात पाचव्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे. सात राज्यांमधील 51 जागांवर आज मतदान होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, जयंत सिन्हा, राज्यवर्धन सिंह राठोड यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे.