लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 06:18 AM2024-03-17T06:18:29+5:302024-03-17T06:19:11+5:30
एकूण ७ टप्प्यांमध्ये होणारी लोकसभा निवडणूक राज्यात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: बहुप्रतिक्षित १८ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. एकूण ७ टप्प्यांमध्ये होणारी लोकसभा निवडणूक राज्यात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये होणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी १९ आणि २६ एप्रिल, ७, १३ आणि २० मे अशा पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम व अरुणाचल प्रदेश या ४ राज्यांच्या विधानसभा आणि विविध राज्यांतील विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
निवडणुकीची वैशिष्ट्ये
- सुमारे ८३ दिवस निवडणूक प्रक्रिया पार पडेल. ही आजवरची सर्वांत मोठी निवडणूक प्रक्रिया असणार आहे.
- कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने आऊटर मणिपूर मतदारसंघात दोन टप्प्यांत मतदान होईल.
- यंदा तब्बल १.८२ काेटी नवमतदार प्रथमच मतदान करतील.
- मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, दिव्यांग व गर्भवती महिला मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, मदत केंद्र.
- टप्पा १ - ५ मतदारसंघ - १९ एप्रिल (कंसात २०१९चा विजयी पक्ष)
नागपूर (भाजप), रामटेक (शिवसेना), भंडारा-गोंदिया (भाजप), गडचिरोली-चिमूर(भाजप) आणि चंद्रपूर (काँग्रेस). / भाजप - ३, शिवसेना - १, काँग्रेस - १
- टप्पा २ - ८ मतदारसंघ - २६ एप्रिल
बुलढाणा (शिवसेना), अकोला (भाजप), अमरावती (अपक्ष), वर्धा (भाजप), यवतमाळ-वाशीम (शिवसेना), हिंगोली (शिवसेना), नांदेड (भाजप) आणि परभणी (शिवसेना). / भाजप - ३, शिवसेना - ४, अपक्ष - १
- टप्पा ३ - ११ मतदारसंघ - ७ मे
बारामती (राष्ट्रवादी), सोलापूर(भाजप), माढा (भाजप), सांगली(भाजप), सातारा (राष्ट्रवादी), कोल्हापूर (शिवसेना), हातकणंगले (शिवसेना), रायगड (राष्ट्रवादी), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (शिवसेना), उस्मानाबाद (शिवसेना) आणि लातूर (भाजप). / भाजप - ४, शिवसेना - ४, राष्ट्रवादी - ३
- टप्पा ४ - ११ मतदारसंघ - १३ मे
नंदूरबार (भाजप), जळगाव (भाजप), रावेर (भाजप), जालना (भाजप), औरंगाबाद (एआयएमआयएम), मावळ (शिवसेना), पुणे (भाजप), शिरुर (राष्ट्रवादी), अहमदनगर (भाजप), शिर्डी (शिवसेना) आणि बीड (भाजप). / भाजप - ७, शिवसेना - २, राष्ट्रवादी - १, एआयएमआयएम - १
- टप्पा ५ - १३ मतदारसंघ - २० मे
धुळे (भाजप), दिंडोरी (भाजप), नाशिक (शिवसेना), पालघर (शिवसेना), भिवंडी (भाजप), कल्याण (शिवसेना), ठाणे (शिवसेना), उत्तर मुंबई (भाजप), उत्तर-पश्चिम मुंबई (शिवसेना), उत्तर-पूर्व मुंबई (भाजप), उत्तर-मध्य मुंबई (भाजप), दक्षिण-मध्य मुंबई (शिवसेना) आणि दक्षिण मुंबई (शिवसेना). / भाजप - ६, शिवसेना - ७