भारतीय जवानांचा उल्लेख 'मोदींची सेना', भाजपा नेत्यांना निवडणूक आयोगाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 10:05 AM2019-04-05T10:05:31+5:302019-04-05T10:06:41+5:30
भारतीय जवानांनी केलेल्या कामगिरीवर भाष्य करत मोदींची सेना म्हणून लष्कराच्या जवानांचा उल्लेख केला. यावरून भाजपाचे हे दोन्ही नेते अडचणीत आले आहे
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीचं वातावरणाने देशाच्या राजकारणात रंगत आणली आहे. अनेक राजकीय नेते भाषणाबाजी करताना काही तरी बरळतात किंवा टोलेबाजीच्या नादात भाषणात काय बोलतोय हेदेखील कळत नाही. अशा जोशात वक्तव्य केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे.
पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये एअर स्ट्राईकचा संदर्भ देत भारतीय जवानांनी केलेल्या कामगिरीवर भाष्य करत मोदींची सेना म्हणून लष्कराच्या जवानांचा उल्लेख केला. यावरून भाजपाचे हे दोन्ही नेते अडचणीत आले आहे.
उत्तर प्रदेशातील रामपूर येथील भाषणात केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, मोदींच्या सेनेने दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. या वादग्रस्त वक्तव्यावर उत्तर प्रदेशच्या निवडणूक आयोगाकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचसोबत या विधानाची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ पुरावादेखील मागविण्यात आला आहे. त्यानंतर या विधानाची विशेष टीमकडून तपासणी केली जाईल, चौकशीत दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेमध्ये बोलताना भारतीय लष्करी जवानांचा मोदींची सेना म्हणून उल्लेख केला होता. त्यावर विरोधकांनी योगी आदित्यनाथ आणि भाजपावर टीकेचे झोड उठवली होती. योगीच्या या वक्तव्याचा समाचार घेत एमआयएमचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले होते की, लष्करी जवान हे कोणत्याही व्यक्तीचे नाही तर भारताचे जवान आहेत असा टोला लगावला होता. योगी आदित्यनाथ यांच्या विधानवरही निवडणूक आयोगाने उत्तर मागितले आहे.
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील बालकोट भागात दहशतवादी तळांना टार्गेट केले. या एअर स्ट्राईकनंतर संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे हे शक्य झालं असा प्रचार भाजपाकडून केला जाऊ लागला. यातून भाजपाचे नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारंवार एअर स्ट्राईकचा उल्लेख करताना अशी वादग्रस्त विधान करत आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने आचारसंहितेत कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रचारात लष्कराचा फोटो वापरु नये असं बजावलं आहे.