Video - भाजपाचे उमेदवार नायब सैनी यांचे गावकऱ्यांनी चप्पलांचा हार घालून केले स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 11:52 AM2019-04-11T11:52:20+5:302019-04-11T13:58:15+5:30
कुरुक्षेत्र येथील भाजपाचे उमेदवार नायब सैनी यांना गावकऱ्यांनी विरोध केला आहे. सैनी गावकऱ्यांची भेट घेत असताना काही गावकऱ्यांनी त्यांचे चप्पलांचा हार घालून स्वागत केले आहे.
नवी दिल्ली - लोकसभा 2019 ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तशी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. कुरुक्षेत्र येथील भाजपाचे उमेदवार नायब सैनी यांना गावकऱ्यांनी विरोध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून नायब सैनी यांना कुरुक्षेत्र येथील मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सैनी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह गावकऱ्यांची भेट घेतली. मात्र गावकऱ्यांची भेट घेत असताना काही गावकऱ्यांनी त्यांचे चप्पलांचा हार घालून स्वागत केले आहे. तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. नायब सैनी यांना गावकऱ्यांनी चप्पलांचा हार घातल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत.
17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.