'मोदींच्या उमेदवारी अर्जासाठी १.२७ कोटींचा चुराडा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 10:45 AM2019-04-28T10:45:14+5:302019-04-28T10:46:53+5:30
संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह निवडणूक आयोगाकडे सोपविला असून नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.
वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचे उलंघन केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. आपचे राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींनी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी एक कोटी २७ लाख रुपयांचा चुरडा केल्याचे म्हटले आहे. यावर भाजपकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
लोकसभा मतदार संघासाठी उमेदवाराला ७० लाख रुपये खर्च करण्याची तरतूद आहे. संजय सिंह म्हणाले की, लोक येथे चार्टर्ड प्लेनने आले. वाराणसीतील सर्व हॉटेल देशभरातून आलेल्या भाजप नेत्यांसाठी बुक करण्यात आलेल्या होत्या. दुपारच्या जेवनाचे हजारो पॅकेट वाटण्यात आले. तसेच अर्ज सादर करताना शेकडो गाड्या आल्या होत्या. संपूर्ण वाराणसी शहर बॅनर, झेंडे आणि पोस्टर्सने रंगले होते. सोशल मीडिया आणि साउंड सिस्टम बसविण्यासह इतर बाबींवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे. हा खर्च सुमारे एक कोटी २७ लाख रुपये असल्याचे संजय सिंह यांनी सांगितले.
यावेळी संजय सिंह यांनी आरोप केला की, उमेदवारी अर्ज भरताना धार्मिक गाणे लावण्यात आले होते. यातून जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच महादेव आणि हनुमानाचे रुप धारण करून कलाकारांकडून 'हरहर मोदी'चे नारे लावण्यास सांगितले गेले. याचा विरोध दर्शवित संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह निवडणूक आयोगाकडे सोपविला असून नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.