17 राज्यं, 28 प्रचारसभा अन् 150 प्रकल्प... निवडणूक घोषणेआधीचा मोदींचा अॅक्शन प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:18 PM2019-03-12T12:18:09+5:302019-03-12T12:23:30+5:30
लोकसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराचा धूमधडाका लावला होता. गेल्या महिनाभरात मोदींनी 17 राज्यांमध्ये जाऊन जवळपास 28 ठिकाणी प्रचार सभा घेतल्या
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराचा धूमधडाका लावला होता. गेल्या महिनाभरात मोदींनी 17 राज्यांमध्ये जाऊन जवळपास 28 ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. या प्रचार सभा ज्या ठिकाणी घेतल्या गेल्या ती महत्त्वपूर्ण राज्य होती ती म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्य. 2014 लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर एनडीए सरकारचे सर्वाधिक खासदार याच राज्यांतून निवडून आले होते.
आंध्र प्रदेश राज्याचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वाचा होता कारण या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणूकीसाठीही मतदान पार पडणार आहे. सध्या या राज्यात तेलुगू देसम पार्टीची सत्ता आहे. चंद्राबाबू नायडू या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशच्या मागील विधानसभा निवडणुकीत टीडीपीला 117 जागा, वायएसआर कॉंग्रेसला 70 जागा, टीआरएसला 63 जागा, कॉंग्रेसला 22 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला फक्त 9 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र एकेकाळी एनडीएसोबत असणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएची साथ सोडून युपीएशी घरोबा केला आहे. भाजपविरोधी महाआघाडीमध्ये चंद्राबाबू नायडू यांचा सिंहाचा वाटा आहे.
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये 157 प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पाडले. यात महामार्ग, रेल्वे प्रकल्प, रुग्णालये, मेडीकल कॉलेज, मेट्रो, जल प्रकल्प यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला होता.
महाराष्ट्रात यवतमाळ, धुळे या ठिकाणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावत शेकडो कोटीच्या विकासकामाचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. तर सोलापूरात कष्टकरी कामगारांसाठी 30 हजार घरांचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडले, अलीकडेच नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिनाभरात २ लाख कोटींच्या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला. यात पंतप्रधान किसान सन्मान योजना, अमेठी येथे रायफलचा कारखाना, इंडीया गेटजवळ युद्धातील शहीदांचे भव्य स्मारक आणि बिहारसाठी ३३ हजार कोटी मदतीची घोषणा हे समाविष्ट आहे.
त्यामुळे एकंदर निवडणुकीच्या रणांगणात विरोधक निवडणूक घोषित होण्यासाठी वाट पाहत राहिले तर दुसरीकडे नरेंद्र मोदी सरकारने प्रचारात बाजी मारली असेच म्हणावे लागेल.