भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 10:01 AM2019-03-17T10:01:50+5:302019-03-17T11:24:33+5:30
दिल्लीत शनिवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय भाजप निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी देशातील अनेक राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली
नवी दिल्ली - दिल्लीत शनिवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय भाजप निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी देशातील अनेक राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. आज भाजपच्या उमेदवारांची यादीची घोषणा करण्याची शक्यता आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
Delhi: Prime Minister Narendra Modi leaves from BJP's Central Election Committee (CEC) meeting held at the party headquarter. pic.twitter.com/Vm0KRk5CbD
— ANI (@ANI) March 16, 2019
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक 11 एप्रिल रोजी होणार असून या पहिल्या टप्प्यातील मतदार संघातील उमेदवार यादी कालच्या बैठकीत अंतिम करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 मतदार संघात निवडणूक पार पडणार आहे.
आगामी लोकसभेसाठी काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. तर 40 नवीन चेहऱ्यांना रिंगणात उतरवणार आहे. ज्या विद्यमान खासदारांविरोधात मतदारसंघात नाराजी आहे अशांना पक्षाकडून उमेदवारी नाकारली जाणार असल्याची माहिती भाजप नेत्यांकडून मिळाली आहे. तसेच काही खासदारांचे मतदार संघ बदलले जाण्याची शक्यता आहे. तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती भाजपा सूत्रांकडून मिळाली आहे. देशातील 28 राज्यांपैकी 12 राज्यांमध्ये भाजपाची आणि 6 राज्यांमध्ये भाजपा युतीची सत्ता आहे. यातील काही राज्यात भाजपविरोधी वातावरणाचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे या राज्यांमध्ये ज्या विद्यमान खासदारांविरोधात नाराजी आहे अशांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षनेतृत्त्वाने घेतला.
भाजपच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर सत्ताधारी भाजप आज पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीनंतर पहिल्या यादीतील 100 उमेदवारांची घोषणा होईल. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटकसह उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार असल्याची औपचारिक घोषणाही आज होऊ शकते. 2014 मध्ये मोदींनी वाराणसीमधूनच निवडणूक लढवली होती आणि पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. भाजपच्या पहिल्या यादीत आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या 42 जागांसह पश्चिम यूपी, बिहार, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओदिशा आणि महाराष्ट्रातील जागांचा समावेश असू शकतो. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सगळ्या जागांवर पहिल्याच टप्प्यात मतदान होणार आहे. तर इतर राज्यांच्या काही जागांवर पहिल्या टप्प्यातही मतदान होणार आहे.
राज्यात शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर राज्यात एकूण 25 जागांवर भाजपचे उमेदवार लढणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात निवडणूक असणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारांची नावेही या यादीत असण्याची शक्यता आहे.