Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:14 PM2024-05-06T17:14:42+5:302024-05-06T17:20:58+5:30
Lok Sabha Elections 2024 Amit Shah And Mamata Banerjee : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी सोमवारी एका सभेत सांगितलं की, "दीदी दुर्गापूरमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी 15 दिवसांपासून प्रचार करत आहेत, पण मी त्यांना आव्हान देतो, तुम्ही इथे पाच वर्षे राहिलात तरी तुम्हाला दुर्गापूर जिंकता येणार नाही."
"बंगालमध्ये भ्रष्टाचार आणि निवडणुकीतील हिंसाचार सामान्य झाला आहे. आजच बॉम्बस्फोट झाला. त्यांना (ममता बॅनर्जी) लोकांना घाबरवायचं आहे, पण दुर्गापूरच्या लोकांनो लक्षात ठेवा, निवडणूक आयोगाने केंद्रीय फौजफाटा तैनात केला आहे, ममता दीदींच्या गुंडांना घाबरण्याची गरज नाही. उघडपणे मतदान करा. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या क्रमांकावर नेणं होय."
"काँग्रेस 70-70 वर्षांपासून राम मंदिराची उभारणी रखडवत होती, पण पंतप्रधान मोदींनी अवघ्या पाच वर्षांत मंदिर बांधलं. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पुतण्याला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं होतं, पण ते अयोध्येला गेले नाहीत. ते का गेले नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे का? मी सांगतो, त्यांना त्यांच्या व्होट बँकेची भीती वाटते. हे घुसखोर आले आहेत ही त्यांची व्होट बँक आहे. याचीची ममता दीदींना भीती वाटते."
"ममता दीदी त्यांच्या व्होट बँकेमुळे CAA ला विरोध करत आहेत. हे लोक पैसे गोळा करतात आणि ते सर्व आपल्या पुतण्यांना देतात. इंडिया आघाडीचे लोक जमले आणि घोटाळे करत आहेत. दीदींच्या मंत्र्यांच्या घरात 50 कोटींची रोकड सापडली आहे. काल रात्री झारखंडमधील एका मंत्र्याच्या घरातून 30 कोटी रुपये जप्त करण्यात आले" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.