"...तर पाकिस्तानला सहकार्य करण्यास भारत तयार", संरक्षणमंत्र्यांनी शेजारील देशांना ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 01:52 PM2024-04-11T13:52:34+5:302024-04-11T13:55:07+5:30
भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी देश चीन आणि पाकिस्तानला ठणकावले आहे.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशा परिस्थितीत भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी देश चीन आणि पाकिस्तानला ठणकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असताना भारताची एक इंच जमीन सुद्धा चीन काबीज करू शकत नाही, तर पाकिस्तानला दहशतवादाचा फटका सहन करावा लागेल, असे राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "मित्र जीवनात बदलू शकतात, शेजारी नाही. पीओके आमचा होता, आमचा आहे आणि राहील. जर पाकिस्तानला वाटत असेल की तो दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ आहे. तर भारत सहकार्य करण्यास तयार आहे. दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानला भारत सहकार्य करण्यास तयार आहे. पाकिस्तानला दहशतवादाचा फटका सहन करावा लागेल."
याआधी बुधवारी राजनाथ सिंह यांनी संभलमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले होते की, यावेळी देश सुरक्षित हातात आहे आणि देशातील जनतेने काळजी करण्याची गरज नाही. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, भाजपाने जेव्हापासून कलम 370 रद्द करण्याचे काम केले आहे, तेव्हापासून तेथे फुटीरतावाद नाही किंवा दगडफेक झाली नाही. काश्मीरमध्ये शांतता आहे. पीओकेचे लोक आम्हाला काश्मीरचा भाग बनवा असे म्हणू शकतात, हे देखील शक्य आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावे चीनने बदलली आहेत. याबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, एखाद्या गोष्टीचे नाव बदलल्याने त्या वस्तूवरील अधिकार बदलू शकत नाहीत. भारताने चिनी ठिकाणांची नावे बदलली तर ती ठिकाणे भारताची होतील का? असा सवाल करत चीनची अशी पावले जमिनीवरील वास्तव बदलू शकत नाहीत, असे राजनाथ सिंह म्हणाले.