Lok Sabha Elections 2024 : आता घरबसल्याही 'या' लोकांना करता येणार मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 05:35 PM2024-03-16T17:35:34+5:302024-03-16T17:46:36+5:30
Lok Sabha Elections 2024 : देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार असून चार जूनला निकाल जाहीर होणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार असून चार जूनला निकाल जाहीर होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, संपूर्ण देशात प्रथमच 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदार घरबसल्या मतदान करू शकणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, यावेळी संपूर्ण देशात प्रथमच अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या किंवा 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या मतदारांना फॉर्म 12 डी वितरित केला जाईल. त्यांना मतदान केंद्रावर जायचं नसेल तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचं मत नोंदवलं जाईल. यासाठी आम्ही निवडणूक कर्तव्यात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, अधिसूचना जारी केल्यापासून पाच दिवसांच्या आत, संबंधित क्षेत्रातील BLO मतदारांच्या घरोघरी जाऊन फॉर्म 12-D भरून जमा करतील. यामध्ये फॉर्म भरायचा की नाही हा मतदाराचा निर्णय आहे. तो मतदान केंद्रावर जाऊन मतदानही करू शकतो. अधिकाधिक वृद्ध आणि दिव्यांग लोकांना मतदान करावं हा त्या मागचा उद्देश आहे.
यापूर्वी, सरकारने 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी निवडणूक नियमांमध्ये सुधारणा केली होती. आतापर्यंत 80 वर्षांवरील व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकत होत्या. मतदारांची माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, देशात एकूण मतदारांची संख्या 96.8 कोटी आहे. त्यापैकी 49.7 कोटी पुरुष आणि 47 कोटी महिला आहेत. यावेळी 1.82कोटी मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. 12 राज्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे.