"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:28 AM2024-05-29T11:28:11+5:302024-05-29T11:30:56+5:30
Lok Sabha Elections 2024 : माधवी लता यांनी, 13 मेरोजी हैदराबादमध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर, त्यांनी AIMIM प्रमुख ओवेसी यांना इशाराही दिला आहे.
लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. आता 1 जूनला सातव्या अर्थात अखेरच्या टप्प्याचे मतदान होणा र आहे. मात्र, या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात हैदराबादमध्ये झालेल्या मतदानासंदर्भात बोलताना, आपल्या मतदारसंघाता मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले आहे, असा दावा भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी केला आहे. त्या एबीपी न्यूजसोबत बोलत होत्या.
बोगस मतदानाचा दावा -
माधवी लता यांनी, 13 मेरोजी हैदराबादमध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर, त्यांनी AIMIM प्रमुख ओवेसी यांना इशाराही दिला आहे. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना इशारा देताना माधवी म्हणाल्या, "4 जूनला निकाल पाहू, मग मी सोडणार नाही." एवढेच नाही, तर "याला (ओवेसी) तर तडीपार करायला हवे. येथे मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले आहे आणि बोगस मतदान करून जिंकण्यात काय मोठेपणा?" असेही माधवी म्हणाल्या.
एफआयआर दाखल करणारी महिलाच बोगस मतदार -
माधवी म्हणाल्या, ज्या महिलेने आपल्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे, ती महिला स्वतःच एक बोगस मतदार असल्याचे समोर आले आहे. मी तिच्या घरचा पत्ता आणि प्रमाणपत्र शोधून काढले आहे. ते घर तिचे नाहीच. या शिवाय, अल्पसंख्याकांच्या बूथवर अधिकचे मतदान झाल्याचा दावाही त्यांनी केला. हिंदू राहत असलेल्या भागांतील मतदान सायंकाळी ७ वाजताच बंद करण्यात आले. मग अल्पसंख्यकांच्या बुथवर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान कसे सुरू होते? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
माधवी लता यांनी दावा केला आहे की, या वेळी तब्बल 2.30 लाख मते अधिकची पडली आहेत. यात रात्रीच्या 9 वाजेपर्यंत कुणाला माहीत किती मते पडली असतील?
महिलांचे हिजाब वर करून तपासली होती ओळख -
तत्पूर्वी, हैदराबाद लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्यावेळी, सकाळच्या सुमारास भाजप उमेदवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्या बुरखा परिधान केलेल्या मुस्लिम महिलांची हिजाब वर करून ओळख तपासतानाही दिसल्या हत्या.