महाराष्ट्रात लोकसभेला कोणाला किती जागा? चुरशीची लढत होणार, ताज्या सर्व्हेची अशी आहे आकडेवारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 10:46 AM2023-12-14T10:46:38+5:302023-12-14T10:50:15+5:30
लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे.
मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे लागलं आहे. मागील दोन निवडणुकांत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणूक जिंकून विजयी हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे, महागाई, बेरोजगारी यांसारखे मुद्दे उपस्थित करत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडूनही लोकांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अशातच आज निवडणुका झाल्या तर देशातील राजकीय चित्र काय असू शकतं, याबाबत टाइम्स नाऊ आणि इटीजी रिसर्च यांनी संयुक्तपणे एक सर्व्हे केला असून यामध्ये महाराष्ट्रातील जागांबाबतही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे. टाइम्स नाऊ आणि ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास ४८ जागांपैकी महायुतीला २७ ते ३१ जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला १७ ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसंच इतरांना एक किंवा दोन जागांवर यश मिळेल, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.
मतांची टक्केवारी कशी असेल?
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होत असली तरी दोघांना मिळत असलेल्या मतांमध्ये ६ टक्क्यांचा फरक राहण्याचा अंदाज टाइम्स नाऊ-ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार महायुतीला ४७ टक्के मतं मिळतील, तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मिळण्याचा अंदाज आहे.
राजकीय उलथापालथ आणि बदललेलं समीकरण
महाराष्ट्रात मागील काही वर्षांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं अनपेक्षितपणे काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र मागील वर्षी जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकारही कोसळलं. हे राजकीय वादळ शांत होण्याआधीच यंदा अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध डावलून महायुती सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीतही फूट पडली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांना भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळणार आहे.