Mallikarjun Kharge : "७५८ वेळा मोदी, ४२१ वेळा मंदिर-मशीद, २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं, पण..."; खरगेंनी हिशोबच मांडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 09:48 AM2024-05-31T09:48:42+5:302024-05-31T10:05:35+5:30
Lok Sabha Elections 2024 Mallikarjun Kharge And Narendra Modi : काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर आरोप केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेस भाजपावर हल्लाबोल करत आहे. सातव्या टप्प्यातील प्रचार संपण्याच्या काही तास आधी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर आरोप केला आहे. "भाजपाच्या प्रचाराबाबत बोलायचं झालं तर, पंतप्रधान मोदींनी गेल्या १५ दिवसांत आपल्या भाषणात २३२ वेळा काँग्रेसचा उल्लेख केला. या काळात त्यांनी ७५८ वेळा स्वतःचं 'मोदी' नाव घेतलं" असं म्हटलं आहे.
"पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ५७३ वेळा इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांबद्दल भाष्य केलं आहे, पण महागाई आणि बेरोजगारीबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारादरम्यान ४२१ वेळा मंदिर-मशीद आणि समाजात फूट पाडण्याबाबत बोलले. त्यांनी मुस्लिम, अल्पसंख्याक आणि पाकिस्तान असे शब्द २२४ वेळा वापरले, परंतु निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही" असं खरगेंनी म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने चुनाव प्रचार के दौरान 421 बार मंदिर-मस्जिद और समाज को बांटने की बात की।
— Congress (@INCIndia) May 30, 2024
उन्होंने 224 बार मुस्लिम, माइनॉरिटी जैसे शब्दों का भी इस्तेमाल किया।
लेकिन चुनाव आयोग ने इसपर कोई कार्रवाई नहीं की।
: कांग्रेस अध्यक्ष श्री @khargepic.twitter.com/5p8GlSAz9q
"इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल"
निवडणूक निकालांबाबत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "आम्हाला विश्वास आहे, देशातील जनता ४ जून २०२४ रोजी नवीन पर्यायी सरकारला जनादेश देईल. इंडिया आघाडी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल आणि आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ. मोदीजी आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी धार्मिक आणि फुटीरतावादी मुद्द्यांवर लोकांची दिशाभूल करण्याचे अगणित प्रयत्न केले, तरीही लोकांनी आपले मुद्दे निवडले आणि मतदान केले.
"पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार मानतात"
"अठराव्या लोकसभेची ही निवडणूक दीर्घकाळ स्मरणात राहील. या निवडणुकीत देशातील प्रत्येक नागरिक - जात, धर्म, पंथ, प्रदेश, लिंग, भाषा विसरून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र आला आहे. पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार मानतात. भाजपाचे नेतेही ते देवाचा अवतार असल्याचं सांगतात."
"बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात एक गोष्ट सांगितली होती, धर्मातील भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकतो, परंतु राजकारणातील भक्ती किंवा नायक पूजा हा अधोगतीचा निश्चित मार्ग आहे. जो शेवटी हुकूमशाहीवर संपतो" असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.