हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 01:50 AM2024-05-04T01:50:31+5:302024-05-04T01:52:25+5:30
Lok Sabha Elections 2024: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याविरोधात तेलंगणामध्ये एमसीसी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याविरोधात तेलंगणामध्ये एमसीसी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक रॅलीमध्ये मुलांचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
ईमेलच्या माध्यमाने करण्यात आलेल्या तक्रारीत म्हणण्यात आले आहे, “निवडणूक आयोगाने नुकतेच, राजकीय पक्षांना मुलांची सेवा आणि निवडणुकीशी संबंधित प्रचारात अथवा उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी आज, म्हणजेच 1-5-2024 रोजी तेलंगणाच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघात लादरवाजा ते सुधा टॉकीजपर्यंत एका निवडणूक रॅलीमध्ये भाग घेतला होता. या रॅलीचा समारोप सुधा टॉकीजमध्ये एका सार्वजनिक बैठकीने झाला. येथे आपण, व्यासपीठावर अमित शाह यांच्यासोबत काही मुले बघू शकता. यात एक मुलगा भाजपच्या चिन्हासह दिसून आला. हे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे स्पष्ट उल्लंघन आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही सोबत एक फोटोही जोडत आहोत.”
या लोकांविरोधात गुन्हा दाखल...-
तक्रारीत म्हणण्यात आले आहे की, छायाचित्रे आणि व्हिडीओग्राफीच्या आधारे ज्या कथित आरोपी व्यक्तींची ओळख पटली त्यांत, टी यमन सिंह, हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या कोम्पेला माधवी लता, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी आणि आमदार टी. राजा सिंह आदींचा समावेश आहे. हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे स्पष्ट उल्लंघन आहे आणि एक फोटोकॉपीही जोडली आहे. ती तथ्यात्मक रिपोर्टसाठी हैदराबाद शहराचे पोलीस आयुक्त वाइस रेफरी 2 सिटीला पाठवण्यात आली आहे. याशिवाय SHO मोगलपुरा यांना आवश्यक कारवाईसाठी देण्यात आली आहे.
यासंदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक पीएन दुर्गा प्रसाद म्हणाले, 02/05/2024 रोजी सायंकाळी 7:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, टीपीसीसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष जी. निरंजन यांनी सीईओ तेलंगणा राज्यला एक मेल पाठवला होता. जो तथ्यात्मक रिपोर्टसाठी सीपी-हैदराबादला पाठवण्यात आला होता आणि तोच आवश्यक त्या कारवाईसाठी मुगलपुरा पोलीस ठाण्याला पाठवडला. मिळालेल्या माहितीच्या आधारे मी Cr.No: 77/2024, U/S: 188 IPC अंतर्गत गुन्हा नोंदवला असून तपास सुरू करण्यात आला आहे.