Narendra Modi : "काँग्रेसने 'टेक सिटी'ला 'टँकर सिटी' बनवलं", मोदींचं टीकास्त्र; सिद्धरामय्यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 03:22 PM2024-04-21T15:22:55+5:302024-04-21T15:30:14+5:30
Narendra Modi And Lok Sabha Elections 2024 : बंगळुरूमध्ये पाण्याचं भीषण संकट आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून बंगळुरूमध्ये पाण्याचं भीषण संकट आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने ‘टेक सिटी’ला ‘टँकर सिटी’ बनवलं आहे. यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पलटवार केला आहे. "कर्नाटक जेव्हा पूर आणि दुष्काळाशी सामना करत होतं तेव्हा पंतप्रधान कुठे होते?" असा सवाल सिद्धरामय्या यांनी विचारला आहे.
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकातील लोकसभेच्या 28 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. बंगळुरूच्या सर्व जागांवर 26 एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानाच्या काही दिवस आधी शहरातील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "त्यांना देशाला पुढे न्यायचं आहे."
काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "नादप्रभू केम्पेगोडा यांनी बंगळुरूला एक सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण, काँग्रेस सरकारने अल्पावधीतच येथील परिस्थिती बिघडवली. काँग्रेसने टॅक्स सिटीचे टँकर सिटीमध्ये रुपांतर करून पाणी माफियांच्या ताब्यात दिले आहे. शेती असो वा शहरी पायाभूत सुविधा, सर्वत्र बजेट कमी केले जात आहे, काँग्रेस सरकारचे लक्ष केवळ भ्रष्टाचारावर आहे."
"बंगळुरू हे युवा शक्ती, युवा प्रतिभा आणि तंत्रज्ञानाचे पॉवर हाऊस आहे. पण, काँग्रेस आणि इंडिया आघाडी तंत्रज्ञानाच्या विरोधात आहे. आज संपूर्ण जग डिजिटल इंडियाचं कौतुक करत आहे. भारताच्या फिनटेकचं कौतुक केलं. काँग्रेसने जनधन खात्याला विरोध केला होता. काँग्रेसने डिजिटल पेमेंटची खिल्ली उडवली होती. कोरोनाच्या काळात, बंगळुरूच्या आयटी उद्योगाने संपूर्ण जगाला खूप साथ दिली. पण, त्याच काँग्रेसने कोरोनाच्या काळात कोविन प्लॅटफॉर्मला विरोध केला होता. काँग्रेसने मेड इन इंडिया कोरोना लसीची बदनामी केली."
"आम्ही देशाला ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, सेमीकंडक्टर हब, ग्लोबल इनोव्हेशन हब बनवू, जेणेकरून भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा हब होईल. पण, काँग्रेस आणि इंडिया आघाडी 'मोदींना हटवू' म्हणत आहेत. मोदींची गॅरंटी आहे की ते 5G नंतर 6G आणतील, ते म्हणतात 'मोदींना हटवू'. मोदींची गॅरंटी आहे की ते AI आणतील, पण ते म्हणतात 'मोदींना हटवू'" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.