धनकुबेर! तेलंगणा-आंध्र प्रदेशच्या उमेदवारांची संपत्ती ऐकून व्हाल हैराण; आहेत कोट्यवधींचे मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 04:16 PM2024-04-23T16:16:11+5:302024-04-23T16:22:57+5:30
Lok Sabha Elections 2024 : दोन राज्यात अनेक उमेदवार आहेत ज्यांची संपत्ती कोट्यवधींची आहे. अशाच काही श्रीमंत उमेदवारांबाबत जाणून घेऊया...
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे खूप महत्वाचे आहेत. येथे 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
या दोन राज्यांमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही माहिती उमेदवारांशी संबंधित असून समजल्यावर अनेकांना धक्का बसला आहे. होय, या दोन राज्यात अनेक उमेदवार आहेत ज्यांची संपत्ती कोट्यवधींची आहे. अशाच काही श्रीमंत उमेदवारांबाबत जाणून घेऊया...
1. पेम्मासानी चंद्रशेखर
आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातील तेलुगू देसम पार्टीचे (TDP) उमेदवार पेम्मासानी चंद्रशेखर हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये टॉपवर आहेत. त्यांच्याकडे 5598.56 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
2. कोंडा विश्वेश्वरा रेड्डी
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये कोंडा विश्वेश्वरा रेड्डी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेलंगणातील चेवल्ला लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोंडा विश्वेश्वर रेड्डी आहेत, ज्यांची संपत्ती 4568 कोटी रुपये आहे.
3. वायएस शर्मिला रेड्डी
आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहीण वायएस शर्मिला रेड्डी यांचाही श्रीमंत उमेदवारांमध्ये समावेश आहे. आंध्र प्रदेशातील कडप्पा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या वायएस शर्मिला यांच्याकडे सुमारे 182 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे भावाशी असलेले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी जगन मोहन रेड्डी यांच्याकडून 83 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे म्हटले आहे.
4. डी.के. अरुणा
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि तेलंगणातील महबूब नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डीके अरुणा याही कोट्यवधींच्या मालकीण आहेत. त्यांच्याकडे एकूण 67 कोटी रुपयांची संपत्ती आहे.